पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:47 IST2026-05-04T15:39:38+5:302026-05-04T15:47:35+5:30
चार राज्यांपैकी तीन राज्यांचे निकाल विरोधकांसाठी धक्का देणारे आहेत. केरळमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली असली, तर आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचा मोठा पराभव झाला आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
पश्चिम बंगालमध्ये भाजपा, तामिळनाडूमध्ये टीव्हीके, केरळात काँग्रेस आघाडी, आसाममध्ये भाजपा आणि पद्दुचेरीमध्ये भाजपा आघाडी! देशातील चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचा आत्मविश्वास या निकालाने वाढवला आहे, तर इंडिया आघाडीचे काय होणार, या चर्चेला तोंड फुटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भगवामय करण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण झाले. ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत मिळवले. आसाममध्येही सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपाला यश आले. तामिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके इंडिया आघाडीलाच झटका दिला. तर केरळात काँग्रेसने डाव्यांचा पराभव केला. पण, या चार राज्यांच्या निकालाने इंडिया आघाडीचीच पिछेहाट झाली आहे.
दोन वर्षातच इंडिया आघाडीला तडे?
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी यूपीए विसर्जित करून इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सत्तेपर्यंत मजल मारता आली नाही, पण चांगले यश मिळाले. मात्र, त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीलाच तडे जाताना दिसले. आता तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या निकालांनी त्यात भर घातली आहे.
इंडिया आघाडीची बोट डळमळीत
राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभा निवडणुकीत एकसंध असणारी इंडिया आघाडी विधानसभा निवडणुकांवेळीच जास्त कमकुवत होत गेली. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही ममतांनी काँग्रेसला सोबत घेणे टाळले. तर तामिळनाडूतही काँग्रेसचा फार फायदा द्रमुकला झाला नसल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील पराभवामुळे भाजपाशी थेट भिडणाऱ्या दोन नेत्यांनाच झटका बसला आहे. ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन या निकालानंतर काय भूमिका घेतात आणि ते इंडिया आघाडीसोबत राहण्याबद्दलही शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
या निवडणुकीमुळे उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्ष काँग्रेसला सोबत घेणार का? असा प्रश्न आता चर्चेला आला आहे. कारण उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसची पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. प्रादेशिक पक्ष आणि भाजपाच्या थेट संघर्षात काँग्रेसला गेल्या काही निवडणुकांमध्ये फार चांगलं यश मिळू शकलेलं नाही. त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडियाला आणखी तडे जाऊ शकतात.