आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:31 IST2026-05-04T13:29:30+5:302026-05-04T13:31:23+5:30
BJP TMC Workers Clash Bengal : पश्चिम बंगाल निवडणूक निकाल २०२६ दरम्यान आसनसोल, कूचबिहार आणि बांकुरा येथे भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमक. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीमार.

आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
आसनसोल: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आसनसोलमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चकमक झाली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
पश्चिम बंगालमधील २९३ जागांच्या मतमोजणीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ केल्याचे चित्र आहे. सध्याच्या कलानुसार भाजप १९२ जागांवर तर तृणमूल काँग्रेस केवळ ९७ जागांवर आघाडीवर आहे. या निकालांमुळे बंगालच्या राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झाला असून काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. कूचबिहारमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये सशस्त्र चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. बांकुरा या भागातही दोन्ही पक्षांचे समर्थक आमनेसामने आले असून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली आहे.
ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर निशाणा
सुरुवातीच्या कलानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "निवडणूक आयोग मनमानी करत आहे, मात्र अंतिम फेरीनंतर आमचाच विजय होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, कोलकात्यात ममता बॅनर्जी यांच्या 'कालीघाट' येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या भाजप समर्थकांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्याने तणाव वाढला आहे.
आसनसोलमध्ये खळबळ: टीएमसी ऑफिसमध्ये तोडफोड आणि बॉम्ब
मतमोजणी सुरू असतानाच आसनसोलमध्ये टीएमसी कार्यालयावर हल्ला करण्यात आला. आसनसोल इंजिनिअरिंग कॉलेजजवळील मोजणी केंद्राबाहेर दोन गटांत जोरदार चकमक झाली. यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, घटनास्थळी एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
#WATCH | Asansol, West Bengal: Security personnel resort to lathicharge to disperse the people as a scuffle broke out near the counting centre at Asansol Engineering College https://t.co/8cwcbyIeEmpic.twitter.com/FHEJascxrI
— ANI (@ANI) May 4, 2026
कुणाल घोष यांचा 'धीराचा' सल्ला
तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. "आतापर्यंत केवळ ५-६ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, अजून २० फेऱ्या बाकी आहेत. हा अंतिम निकाल नाही, त्यामुळे आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
निकालातील महत्त्वाचे मुद्दे:
मत टक्केवारी: भाजपने ४५% मतांसह आघाडी घेतली आहे, तर टीएमसी ४२% वर आहे.
भवानीपूर: ममता बॅनर्जी या स्वतःच्या मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत.
मोदी फॅक्टर: झाडग्राम जिल्ह्यातील चारही जागांवर भाजपने पकड मजबूत केली आहे.