अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर..; गोपीचंद पडळकरांनी दिलं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:50 AM2021-06-20T11:50:47+5:302021-06-20T11:59:49+5:30

अजित पवार यांना मी आव्हान देतो की, बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला.

भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

गोपीचंद पडळकर यांचे बारामती विधानसभेला डिपॉझिट जप्त झाले होते, एवढ्या फरकाने अजित पवारांनी विजय मिळवला. त्यामुळे, गोपीचंद पडळकरांच्या टीकेला उत्तर का द्यावे, असे अजित पवार म्हणतात.

गोपीचंद पडळकर सातत्याने पवार घराणे आणि अजित पवार यांच्यावर टीका करतात. काही दिवसांपूर्वी, राष्ट्रवादी हाच जातीयवादी पक्ष असल्याचं पडळकर यांनी म्हटलं होतं.

पदोन्नती आरक्षण रद्द केल्यामुळेही त्यांनी अजित पवारांवर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. मात्र, अजित पवारांनी कुठलिही प्रतिक्रिया दिली नाही. केवळ, डिपॉझिट जप्त झालेल्यांबद्दल काय बोलावे, असं ते म्हणाले.

अजित पवारांची ही प्रतिक्रिया ऐकून पडळकर यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य केलंय. विशेष म्हणजे तो विषय आता शिळा झालाय, म्हणत थेट आव्हानच दिलं आहे.

अजित पवार यांना मी आव्हान देतो की, बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला.

निवडणुकीआधी अवघ्या १५ दिवसांपूर्वी पक्षाने मला बारामतीतून लढण्यास सांगितले. पवार यांनी निवडणुकीच्या १५ दिवस आधी फॉर्म भरून अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर आटपाडीमधून स्थानिक नेत्यांचा पाठिंबा न घेता लढवावी.

तर माझ्यासारखीच अवस्था त्यांची होईल. माझा पराभव त्याचवेळी मी मान्य केला आहे. त्याच विषयांवर पवार यांनी बोलु नये. ते तणावात असल्यासारखे वाटतात.

मराठा, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण याविषयावर त्यांनी बोलावे, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी(दि १९) बारामती तालुक्यात विविध समाजातील प्रतिनिधींबरोबर घोंगडी बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

ओबीसी राज़किय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.त्या ओबीसी ३४६ जातींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे पडळकर म्हणाले.