जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:43 IST2026-04-25T16:42:48+5:302026-04-25T16:43:55+5:30

राजस्थानच्या नीमराना येथे भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

She went to deliver a lunch box and was burnt to death in a fire... Death toll in a scrap warehouse! 4 people dead | जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू

जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू

राजस्थानच्या कोटपुतली-बहरोड जिल्ह्यातील नीमराना औद्योगिक क्षेत्रात शुक्रवारी संध्याकाळी काळाने भीषण घाला घातला. येथील एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुलींसह चार जणांचा जिवंत जळून अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, एका किरकोळ चुकीमुळे चार निष्पाप जीवांचा बळी गेल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकी घटना काय?

मोहलडिया-बिचपुरी रोडवर असलेल्या एका भंगाराच्या गोदामात शुक्रवारी संध्याकाळी ही आग लागली. गोदामात परफ्यूमच्या बाटल्या फोडण्याचे काम सुरू होते. यावेळी कोणीतरी विडी पेटवली आणि त्यातील ठिणगीमुळे ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला, अशी चर्चा घटनास्थळी आहे. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोदामातील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

४ जणांचा कोळसा; ७ वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश

या भीषण अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे समोर आली असून ती मन हेलावून टाकणारी आहेत:

आरुषी (७ वर्षे): ही चिमुरडी आपल्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गोदामात आली होती आणि आगीच्या विळख्यात सापडली.

कविता (१६ वर्षे): ही तरुणी गोदामात काम करत होती.

जोनी (पिकअप चालक): बहरोड येथील रहिवासी.

रविदत्त: हरियाणा येथील रहिवासी.

या घटनेत एक महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२ तासांच्या धगधगाटात लाखोंचे नुकसान

आगीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अपर्णा गुप्ता आणि पोलीस अधीक्षक सत्यवीर सिंह यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे भंगार आणि एक पिकअप गाडी जळून खाक झाली आहे.

प्रशासनाविरोधात संताप

निवासी भागात भंगाराचे गोदाम सुरू असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशी धोकादायक गोदामे लोकवस्तीपासून दूर हलवण्याची मागणी आता जोर धरत आहे. पोलिसांनी गोदाम मालकाला ताब्यात घेतले असून, एफएसएल टीम आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहे.

Web Title : कबाड़ गोदाम में आग लगने से दो युवतियों सहित चार की मौत

Web Summary : राजस्थान के एक कबाड़ गोदाम में आग लगने से दो लड़कियों सहित चार लोगों की मौत हो गई। बीड़ी की चिंगारी से परफ्यूम की बोतलें जल गईं। स्थानीय लोग गोदाम के स्थान से नाराज हैं। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Fire in scrap godown kills four, including two young girls.

Web Summary : A fire in a Rajasthan scrap godown killed four, including two girls. A spark from a lit beedi ignited perfume bottles. Locals are angry about the godown's location. Police are investigating.