“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:36 IST2026-04-25T16:33:22+5:302026-04-25T16:36:15+5:30
Deputy CM Eknath Shinde News: बोलतो ते करून दाखवतो… आम्ही टीम म्हणून काम करतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
Deputy CM Eknath Shinde News: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती ऊर्जा, शक्ती, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे आणि म्हणूनच नदी म्हणजे नारीशक्ती! या विचाराला जलसंवर्धन, संस्कृती आणि विकासाची जोड देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ च्या शुभारंभातून एक नवीन विकास मॉडेल मांडल. श्रीक्षेत्र चौंडी हे मराठी संस्कृतीचे माहेरघर येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात त्यांनी राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी नमन करत भाषणाची सुरुवात केली.
चौंडी (जन्मभूमी) ते महेश्वर (कर्मभूमी) हा प्रवास केवळ भौगोलिक नसून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सांगड घालणारा आहे. या यात्रेपूर्वी अहिल्यादेवी स्मारकाचे पूजन, जलकलश पूजन आणि जन्मभूमीच्या पवित्र मातीचा कलश पूजन करण्यात आले. “माती आणि पाणी हेच आपल्या जीवनाचे मूळ,” असे सांगत शिंदेंनी परंपरेचा गौरव केला. नाशिक त्रंबकेश्वर येथे असा उपक्रम राबवला जात आहे. जन्मभूमीतील पवित्र माती व जलकलश शिर्डीमार्गे मध्य प्रदेशातील महेश्वर येथे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या यात्रेला राज्याबरोबरच राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
नारीशक्ती, जलसंवर्धन आणि विकासाचा नवा महामंत्र
जल नसेल तर जग नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाचे महत्व सांगितले. समाज केवळ राजकारणावर नाही, तर धर्म आणि अध्यात्मावर चालतो, असे सांगत त्यांनी वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेचे महत्त्वही अधोरेखित केले. ही जलयात्रा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून जलसाक्षरता, जनजागृती आणि महिला सक्षमीकरणाचा व्यापक उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोदा ते नर्मदा ही केवळ यात्रा नाही, तर नारीशक्ती, जलसंवर्धन आणि विकासाचा नवा महामंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंदिर, घाट, धर्मशाळा उभारून संस्कृती जपली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, त्यांनी मंदिर, घाट, धर्मशाळा उभारून संस्कृती जपली; गंगा, नर्मदा आदी नद्यांच्या काठावर घाट बांधले; शेतकरी व व्यापाऱ्यांना सवलती देऊन अर्थव्यवस्था मजबूत केली; न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि संवेदनशील प्रशासन दिले. अंधश्रद्धा नाकारत “मानवता हाच खरा धर्म” हा विचार त्यांनी रुजवला. महिलांना शिक्षण व स्वावलंबन देत नारीशक्तीला बळकटी दिली. अन्नछत्र, धर्मशाळा आणि सेवा कार्यातून त्यांनी लोककल्याणाचा आदर्श निर्माण केला. “लोकमाता” म्हणून मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव असल्याचे शिंदेंनी नमूद केले.
दरम्यान, बोलतो ते करून दाखवतो… आम्ही टीम म्हणून काम करतो. महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी हिंदुत्वाचा हुंकार, लोकशाहीचा आविष्कार, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक, म्हणजे अहिल्यादेवी असे सांगत त्यांनी सर्वांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.