इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:02 IST2026-04-25T16:01:07+5:302026-04-25T16:02:33+5:30

अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत.

War decision in Islamabad! Trump's envoy and Iranian minister face to face; Will peace be established in the world? | इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?

इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?

अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये खलबतं सुरू झाली आहेत. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर इराणच्या प्रतिनिधींची बाजू ऐकण्यासाठी पाकिस्तानात पोहोचत आहेत. मात्र, चर्चेची टेबलं तयार असली तरी इराणने अमेरिकेशी थेट संवाद साधण्यास नकार दिल्याने या शांतता चर्चेवर सस्पेन्स कायम आहे.

होर्मुझच्या नाकेबंदीवरून इराण आक्रमक

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याचे संकेत दिले असले तरी, होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी हटवण्यास नकार दिला आहे. यावरून इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची संतापले आहेत. "होर्मुझची नाकेबंदी हा युद्धविरामाचाच भंग आहे. जोपर्यंत ही नाकेबंदी हटवली जात नाही, तोपर्यंत अमेरिकेशी कोणतीही थेट चर्चा होणार नाही," अशी भूमिका अराघची यांनी इस्लामाबादमध्ये पोहोचताच मांडली.

पाकिस्तानामार्फत होणार मेसेज पास?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगाई यांनी स्पष्ट केले की, इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये समोरासमोर कोणतीही बैठक ठरलेली नाही. इराणचे म्हणणे पाकिस्तानमार्फत अमेरिकेपर्यंत पोहोचवले जाईल. म्हणजेच, पाकिस्तान या दोन कट्टर शत्रूंमध्ये मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अराघची हे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसीम मुनीर यांचीही भेट घेणार आहेत.

ट्रम्प यांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कूटनीतीला एक संधी देऊ इच्छितात. जर चर्चेत सकारात्मक प्रगती झाली, तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनाही पाकिस्तानात पाठवण्याची तयारी ट्रम्प यांनी दर्शवली आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी रविवारी (२६ एप्रिल) इराणच्या अटी आणि मागण्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

उद्या होणार 'शांती वार्ता'?

सौदी मीडियाच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच रविवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेची पहिली फेरी होऊ शकते. पाकिस्तान दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, इराणने आपल्या अटींचे पालन करण्यावर जोर दिला असून, कोणत्याही दबावाखाली चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता जगाचे लक्ष उद्याच्या या संभाव्य बैठकीकडे लागले आहे.

Web Title : इस्लामाबाद में अमेरिका-ईरान: तनाव के बीच शांति वार्ता?

Web Summary : पाकिस्तान ने इस्लामाबाद में अमेरिका-ईरान के बीच तनाव कम करने के लिए वार्ता कराई। ईरान ने सीधी बातचीत से पहले होर्मुज नाकेबंदी हटाने की मांग की। ट्रंप ने कूटनीति का संकेत दिया; परिणाम अनिश्चित।

Web Title : US, Iran Face-Off in Islamabad: Peace Talks Amidst Tension?

Web Summary : Pakistan brokers US-Iran talks in Islamabad to ease tensions. Iran demands lifting Hormuz blockade before direct talks. Trump signals diplomacy; outcome uncertain.