Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:59 IST2026-04-25T15:58:37+5:302026-04-25T15:59:31+5:30
Rohit Pawar And Bageshwar Baba : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त केला आहे. :

Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता सोडण्याचे ठरविले होते असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. यावरून आता अनेकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकूट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले की ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते," असा दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त केला आहे.
"शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल" असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून… pic.twitter.com/fruZIuyZXH
\— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 25, 2026
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते."
"भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.