“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:35 IST2026-04-25T12:35:00+5:302026-04-25T12:35:35+5:30
AAP Arvind Kejriwal And BJP : भाजपाचे नेते प्रवेश वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
भाजपाचे नेते प्रवेश वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना 'दिल्लीचा रहमान डकैत' असं म्हटलं. ज्याप्रमाणे 'धुरंधर' चित्रपटाचा सिक्वेल आला, त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी आता दिल्लीच्या लोधी इस्टेटमध्ये स्वतःसाठी 'शीशमहल-२' तयार केला आहे, असा गंभीर आरोप वर्मा यांनी केला.
प्रवेश वर्मा म्हणाले की, जो व्यक्ती एकेकाळी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे राहण्याचा आणि साधेपणाचा दावा करायचा, तो आज दिल्लीतील सर्वात महागड्या आणि आलिशान भागांपैकी एक असलेल्या ९४-९५ लोधी इस्टेटमध्ये शिफ्ट झाला आहे. त्यांनी सवाल केला की, "आम आदमी पार्टीचं नाव आता 'आलिशान आदमी पार्टी' असायला हवं. केजरीवाल यांनी सांगावं की या नव्या बंगल्यात किती पैसा गुंतवण्यात आला आहे आणि हा पैसा नेमका कोणाचा आहे?"
पंजाब आणि दिल्लीची तुलना
भाजपा नेत्याने असा दावा केला की, जेव्हा दिल्लीच्या मतदारांनी 'रहमान डकैत'ला नाकारलं, तेव्हा ते पंजाबला गेले, जिथे त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अडचणी वाढवल्या. पंजाबमधील मुख्यमंत्री निवासाच्या आसपासच्या चार मोठ्या सरकारी बंगल्यांवर केजरीवाल आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांचा (सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया) ताबा असल्याचा आरोप त्यांनी केला. वर्मा यांच्या मते, केजरीवाल यांनी पंजाबमध्येही एक 'शीशमहल' बांधला आणि आता दिल्लीत पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती करत आहेत.
#WATCH | Delhi Minister Parvesh Verma says, "...Delhi's Rahman Dakait, just as a sequel to the movie 'Dhurandhar' came out, similarly, we are going to reveal 'Sheesh Mahal 2' today... Kejriwal built the Sheesh Mahal in Delhi when Delhi was suffering from the COVID wave... The… pic.twitter.com/LhsbPMFHFb
— ANI (@ANI) April 25, 2026
"प्रामाणिक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले नसते"
प्रवेश वर्मा पुढे म्हणाले की, जेव्हा दिल्ली कोरोनाच्या लाटेचा सामना करत होती आणि लोक औषधांअभावी मरत होते, तेव्हा केजरीवाल यांच्या आदेशानुसार त्यांच्या जुन्या 'शीशमहल'चं काम एक दिवसही थांबलं नव्हतं. नव्या घराचा लेआउट दाखवत ते म्हणाले की, जर केजरीवाल यांनी खोल्यांच्या सजावटीवर खर्च केलेल्या बुद्धीचा थोडासा भाग दिल्लीच्या समस्या सोडवण्यासाठी वापरला असता, तर आज त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले नसते.
"दिल्लीच्या जनतेची फसवणूक केली”
भाजपाने असा आरोप केला आहे की केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेची फसवणूक केली आहे. एकीकडे दिल्लीतील मूलभूत सुविधा कोलमडत असताना, दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख एकामागून एक आलिशान बंगले बदलत आहेत. दरम्यान, या आरोपांवर आम आदमी पार्टीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु दिल्लीत पुन्हा एकदा 'बंगला राजकारण' शिगेला पोहोचलं आहे.