Mitchell Starc IPL 2026: भारतात सुरु असलेल्या आयपीएलच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क अखेर दुखापतीतून सावरून IPL 2026 मध्ये दाखल झाला आहे. मिचेल स्टार्क यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. त्याच्या येण्याने दिल्ली संघाच्या गोलंदाजीची धार वाढणार आहे. आज पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार का, याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
दुखापतीमुळे होता संघाबाहेर
मिचेल स्टार्क हा आयपीएल २०२६ च्या सुरुवातीपासूनच खांदा आणि कोपऱ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. ॲशेस मालिका आणि त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये खेळताना त्याला या दुखापती झाल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये त्याने पुन्हा गोलंदाजीचा प्रयत्न केला होता, मात्र वेदना कमी होत नसल्याने त्याला सिडनीमध्ये प्रदीर्घ काळ रिहॅबिलिटेशन (Rehab) करावे लागले. अखेर २३ एप्रिल रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यानंतर तो भारतात दाखल झाला आहे.
पंजाबविरुद्ध खेळणार का?
दिल्ली कॅपिटल्सचा आज पंजाब किंग्सविरुद्ध सामना होत आहे. मात्र, स्टार्क आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या स्टार्कला संघ व्यवस्थापन घाईत मैदानात उतरवण्याच्या विचारात नाही. तो सध्या सराव सत्रात भाग घेऊन आपली मॅच फिटनेस सिद्ध करण्यावर भर देणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्टार्क १ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून या हंगामातील आपला पहिला सामना खेळू शकतो.
दिल्लीची गोलंदाजी आणखी मजबूत
स्टार्कच्या अनुपस्थितीत दिल्लीची धुरा मुकेश कुमार, टी. नटराजन आणि लुंगी एन्गिडी यांनी सांभाळली आहे. एन्गिडीने ६ सामन्यात ७ बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मात्र, स्टार्कचा अनुभव आणि त्याचा वेग दिल्लीसाठी निर्णायक ठरू शकतो. आयपीएल २०२५ मध्ये त्याने ११ सामन्यात १४ बळी टिपले होते, ज्यात एका सामन्यात ५ बळी घेण्याचा कारनामा त्याने केला होता. स्टार्कच्या पुनरागमनामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत अधिक मजबूतपणे उतरण्याची शक्यता आहे.