धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:43 IST2026-04-25T13:40:38+5:302026-04-25T13:43:45+5:30

CM Devendra Fadnavis PC News: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

cm devendra fadnavis reaction about bageshwar dham dhirendra shastri and sanjay gaikwad statements over chhatrapati shivaji maharaj | धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…

धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…

CM Devendra Fadnavis PC News: साधू-संत मंडळी असतात, ती त्यांची मते मांडत असतात. मला असे वाटते की, त्यांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. मूळात त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक अशी संघटना आहे, ज्यांनी हिंदू संस्कृती, सनातन संस्कृतीला जिवंत ठेवले आहे. एक नवचैतन्य दिले आहे. त्यामुळे आपल्या घरातील एक मुलगा संघात असावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी, देशातील नागरिकांनी चार मुले जन्माला घालायला हवीत, त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यायला हवा, असे म्हटले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता सोडण्याचे ठरविले होते. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकुट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले की, ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरुच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते, असा दावा शास्त्री यांनी केला. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या विधानावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

महापुरुषांबाबत अनेक लोककथा तयार होतात

इतिहासात असा कुठलाच प्रकारचा दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मूळात आपल्याला माहिती आहे की, जे महापुरुष असतात, त्या महापुरुषांबाबत अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही लोककथा आहेत. त्या सगळ्याचा इतिहासावर किंवा तेथील परिस्थितीवर अवलंबून त्या तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत. मी यावर एवढेच म्हणेन की, आपण जो इतिहास शिकलो आहोत किंवा आपल्याकडे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कोणताही दाखला नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना योग्य ती समज देतील

पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय गायकवाड प्रकरणावरही मत मांडले. ते म्हणाले की, एकतर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्या समजून न घेता आपण आकांडतांडव करतो, तेव्हा ते योग्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. आता हे पुस्तक छापून ४० वर्षे झाली आहेत. आता ४० वर्षांनंतर अशा पद्धतीने एखादा इश्यू तयार करणे, हे कितपत योग्य आहे, याचा विचार केला पाहिजे. विशेषतः अशा पद्धतीने शिवराळ भाषा वापरणे, हे मला योग्य वाटत नाही. निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना योग्य ती समज देतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून पेटलेल्या वादात शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली; मात्र छत्रपती शिवाजी महाराज या उल्लेखाबाबतची आपली ताठर भूमिका कायम ठेवत वादाला नवे वळण दिले आहे. 

 

Web Title : धीरेंद्र शास्त्री और संजय गायकवाड़ के शिवाजी पर बयानों पर फडणवीस की प्रतिक्रिया।

Web Summary : सीएम फडणवीस ने धीरेंद्र शास्त्री के शिवाजी महाराज और आरएसएस पर विवादास्पद बयानों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने अलग-अलग विचारों को स्वीकार किया, ऐतिहासिक सटीकता पर जोर दिया, और संजय गायकवाड़ की टिप्पणियों पर भी बात की, उम्मीद है कि एकनाथ शिंदे उन्हें समझाएंगे।

Web Title : Fadnavis addresses Dhirendra Shastri and Sanjay Gaikwad's Shivaji remarks.

Web Summary : CM Fadnavis responded to Dhirendra Shastri's controversial statements about Shivaji Maharaj and RSS. He acknowledged differing views and emphasized historical accuracy, also addressing Sanjay Gaikwad's remarks, expecting Eknath Shinde to counsel him.