Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:26 IST2026-04-25T13:25:26+5:302026-04-25T13:26:49+5:30
२० टक्के केलेली अन्यायकारक भाडेवाढ त्वरित कमी करा; मराठी नाट्यनिर्मात्यांची मागणी

Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी
संजय घावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेची नाट्यगृहे कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणे अशा राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत महागडी आहेत. मुंबई महापालिकेने लागू केलेली २० टक्के भाडेवाढ अन्यायकारक असून ती कमी करण्यात यावी आणि येथील नाट्यगृहांचे भाडे अन्य महापालिकांच्या नाट्यगृहांप्रमाणे असावे, अशी मागणी मराठी नाट्यनिर्मात्यांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आचार्य अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले नाट्यगृह, पुणे महानगरपालिकेचे बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृह यांचे भाडे मुंबई पालिकेच्या नाट्यगृहांच्या तुलनेत कमी आहे. त्याच प्रमाणे मुंबईतील नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याची मागणी निर्मात्यांनी केली आहे.
प्रतिवर्षी ५ टक्क्यांप्रमाणे...
प्रतिवर्षी पाच टक्क्यांप्रमाणे गेल्या चार वर्षांसाठी एकूण २० टक्के भाडेवाढ केल्याने निर्मात्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह आणि विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे भाडे वाढले आहे.
ज्यांचे बुकिंग होत नाही त्यांचे काय?
कोरोना काळात अधिकाऱ्यांना भेटून दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ करू नका, असे निर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले. दरवर्षी भाडेवाढ झाल्यास चार-पाच वर्षांनी हा आकडा खूप वाढेल. चांगले बुकिंग मिळते त्यांना परवडेल. पण ज्यांचे बुकिंग ४०-५० हजार रुपयेही नसते त्यांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नाट्यगृहाच्या भाड्याखेरीज महानगरपालिकेनुसार इतर सर्व वस्तूंचे आणि त्यांच्या वापराचे वेगवेगळे दर ठरलेले आहेत. त्यानुसार निर्मात्यांना लाइट्स-माईक्सपासून कन्झमशनपर्यंत पैसे भरावे लागतात. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे सगळीकडे नाट्यगृहात जाहिरात करण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. हा खर्च नाट्यगृहाच्या भाड्यात समाविष्ट नसतो. प्रभाकर सावंत (सूत्रधार, निर्माते)
महापालिकेने गेली चार वर्षे नाट्यगृहांचे भाडे वाढविले नव्हते आणि देखभाल व अन्य व्यवस्थेच्या खर्चात मात्र वाढ झाली आहे. आता केवळ पाच टक्के वाढ करण्यात आली असून मराठी नाटकांसाठी नाट्यगृह सवलतीच्या दरानेच दिले जाते. या भाडेवाढीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न किंवा व्यापारी दृष्टिकोन नाही. भाड्याच्या उत्पन्नातून जमाखर्चाचाही मेळ बसत नसून भाडेवाढ क्रमप्राप्तच आहे. अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका