प्रेरणादायी! 'या' भारतीयाला इलॉन मस्कने कंपनीतून काढले; आता उभारली ₹१९,००० कोटींची कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:09 IST2026-05-06T13:04:51+5:302026-05-06T13:09:33+5:30
२०२२ मध्ये Twitter विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी तत्कालीन भारतीय CEO ला कंपनीतून बाहेर काढले होते.

पराग अग्रवाल हे नाव पुन्हा एकदा टेक जगतात चर्चेत आले आहे. इलॉन मस्क यांनी Twitter विकत घेतल्यानंतर CEO पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर काही काळ ते लाईमलाईटपासून दूर राहिले. मात्र आता त्यांनी AI क्षेत्रात दमदार पुनरागमन करत स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे.

२०२२ मध्ये इलॉन मस्क यांनी Twitter विकत घेतल्यानंतर कंपनीत मोठे बदल केले होते. Twitter चे नाव बदलून X करण्यात आले आणि त्याचवेळी तत्कालीन CEO पराग अग्रवाल यांनाही पदावरून हटवण्यात आले. त्या काळात पराग अग्रवाल यांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र त्यांनी हार न मानता AI क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आणि आता त्याच कंपनीची जोरदार चर्चा होत आहे.

पराग अग्रवाल यांनी सुरू केलेल्या AI स्टार्टअपचे नाव Parallel Web Systems असे आहे. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांवर काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्टार्टअपने नुकतीच मोठी फंडिंग उभारली असून कंपनीचे मूल्यांकन तब्बल २ बिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे ₹१९ हजार कोटींवर पोहोचले आहे.

रिपोर्टनुसार, Parallel Web Systems ने जवळपास १०० मिलियन डॉलर्सची फंडिंग उभारली आहे. टेक मार्केटमध्ये AI क्षेत्राला मिळत असलेल्या वेगवान प्रतिसादामुळे या कंपनीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. OpenAI च्या ChatGPT सारख्या AI टूल्सनंतर जगभरात AI सेक्टरमध्ये मोठी क्रांती झाली आहे. अशा परिस्थितीत पराग अग्रवाल यांचा अनुभव आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील मजबूत पार्श्वभूमी त्यांच्या स्टार्टअपसाठी मोठी ताकद मानली जात आहे.

Google, Meta आणि OpenAI साठी नवे आव्हान? टेक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भविष्यात Parallel Web Systems ही कंपनी Google, Meta आणि OpenAI सारख्या दिग्गज कंपन्यांसमोर आव्हान उभे करू शकते. सध्या कंपनीच्या प्रॉडक्ट्स आणि सेवांबाबत फारशी माहिती समोर आलेली नसली तरी कमी कालावधीत वाढलेले मूल्यांकन आणि मोठी गुंतवणूक यामुळे टेक जगतात उत्सुकता वाढली आहे.

मोठ्या कंपनीतून बाहेर पडल्यावरही नव्या संधी शोधत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, हे पराग अग्रवाल यांनी दाखवून दिले आहे. एका अपयशानंतर त्यांनी AI क्षेत्रात नवी सुरुवात करत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे. आता टेक जगतात सर्वांचे लक्ष त्यांच्या कंपनीच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.

















