३ दिवसांत २००० रुपयांनी स्वस्त झालं सोनं, अजून दर घसरण्याची शक्यता

By ravalnath.patil | Published: November 25, 2020 02:44 PM2020-11-25T14:44:49+5:302020-11-25T15:27:22+5:30

सोने-चांदी खरेदा करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. बुधवारी सलग तिसर्‍या व्यापार सत्रात सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. 3 दिवसात सोन्याच्या दर 2000 रुपयांनी कमी झाले.

एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत 0.21 टक्क्यांनी कमी होऊन 48,485 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 0.16 टक्क्याने कमी होऊन 59,460 रुपये प्रति किलो झाली आहे.

आधीच्या सत्रात सोन्याची वायदा किंमत 900 रुपये तर चांदीची वायदा किंमत 1600 रुपयांनी कमी झाली होती.

ब्रोकरेज फर्म एंजल ब्रोकिंगचे डेप्यूटी व्हीपी अनुज गुप्ता यांच्या मते, या महिन्यात गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 10 लाख औंसची घसरण झाली आहे. याचा अर्थ असा की गुंतवणूकदार हळूहळू सोन्यावरून होल्डिंग कमी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे कमोडिटी अॅनालिस्ट तपन पटेल (HDFC Securities Senior, Analyst (Commodities) Tapan Patel) आणि मोतीलाल ओसवालचे वीपी रिसर्च नवनीत दमानी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीसंदर्भात समोर आलेल्या बातम्यामुळे सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात सोन्याबाबत सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे किरकोळ वाढले आहेत. मात्र, सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तराच्या जवळपास आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्याने वाढून 1,809.41 डॉलर प्रति औंस झाले आहेत. कमजोर डॉलरमुळे सोन्याला सपोर्ट मिळाला आहे.

अमेरिका रिझर्व्ह बँक फेडरल रिझर्वच्या बैठकीच्या मिनिटांची प्रतीक्षा सोन्याचे व्यापारी करत आहेत. फेडचे मिनट्स आज रात्री उशिरा जारी होतील.