गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 07:19 IST2026-04-22T07:07:39+5:302026-04-22T07:19:41+5:30

Gurupushyamrut Yoga April 2026: गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जुळून येत असून, या शुभ दिनी नेमके काय केल्यास विविध प्रकारे लाभ प्राप्त होऊ शकतो? जाणून घ्या...

Gurupushyamrut Yoga April 2026: गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत योग हा असाच एक योग आहे. हा योग वारंवार येत नाहीत. या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते.

यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते.

गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी गुरुपुष्यामृतयोग रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटांपासून ते पहाटे ०६ वाजून १७ मिनिटांपर्यंत असणार आहे.

गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.

गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आल्यामुळे आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. गुरुपुष्यामृत योग असेल, त्या वेळेत स्वामींचे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा शक्य तितका जप करावा. स्वामींचा तारक मंत्र म्हणावा, असे सांगितले जाते.

गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते.

गुरु पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून 'ओम् श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिन्यै धनधान्य समृद्धि देहि देहि नमः' हा मंत्र १०८ वेळा म्हणावा.

गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ असते. असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते. तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्हीसांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते.

या दिवशी तांदूळ, मसूर, खिचडी, बुंदीचे लाडू इत्यादींचे सेवन करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय करणे, गुंतवणूक करणे खूप शुभ मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, अशी मान्यता आहे.

पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनि असल्याने शनिची कृपादृष्टी मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. आताच्या घडीला शनि गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत आहे. त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू आहे.

साडेसाती, शनि ढिय्या म्हणजेच अडीचकी, शनि महादशा, शनिची अंतर्दशा सुरू असलेल्यांनी शनिशी संबंधित उपाय करावेत. शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे. हनुमंतांचे नामस्मरण, मंत्रांचे जप करावेत. शनि स्तोत्रे, शनि मंत्र यांचा आवर्जून यशाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते.

गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असल्यामुळे गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी गुरुशी संबंधित मंत्रांचे जप, गुरुचे उपाय, गुरुशी संबंधित वस्तूंचे दान अवश्य करावे, असे म्हटले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.

गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग जुळून आला असून, या दिवशी पंचमहापुरुष यापैकी एक मानला गेलेला मालव्य राजयोग जुळून येत आहे. तसेच शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत असणार आहे. तर, सूर्य ग्रह उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत असणार आहे. तसेच या दिवशी गंगा सप्तमी असून, गंगापूजनाचा सुवर्ण योग जुळून आला आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.