Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 06:41 IST2026-04-22T06:40:09+5:302026-04-22T06:41:38+5:30
Nesco Rave Party: नेस्को ड्रग्ज पार्टीनंतर कॉन्सर्ट आडून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा चेहरा उघड झाला. यात थेट जेन-झी तरुणाईला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे.

AI Image
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नेस्को ड्रग्ज पार्टीनंतर कॉन्सर्ट आडून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा चेहरा उघड झाला. यात थेट जेन-झी तरुणाईला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. एमडीएमए (एक्स्टसी) आणि एलएसडी अशा ड्रग्जला आकर्षक रंग, ब्रॅण्डेड चिन्हं आणि ‘कूल’ प्रतिमेचे कवच देऊन बाजारात ढकलले जात आहे. त्यामागे संगठित जाळे कार्यरत असून, अमली पदार्थविरोधी विभागाने त्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक कॉन्सर्स्टमध्ये अमली पदार्थ विरोधी विभागाचा ‘सिव्हिल स्कॉड’ तैनात राहणार आहे.
टिटवाळा येथे ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलच्या घरातून जप्त केलेल्या एमडीएमए गोळ्यांवर विविध चिन्हे आढळली. यात पिवळ्या, निळ्या, गुलाबी, जांभळ्या रंगांच्या या गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपल अशा कंपन्यांचे लोगो, प्रसिद्ध ब्रॅण्ड्स किंवा कार्टून चिन्हे वापरून ग्राहक विशेषतः ‘जनरेशन झेड’ यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नेस्को प्रकरणात जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज तर वरळी कक्षाने जप्त केलेल्या गोळ्यांवर ऑडीचे चित्र होते. तज्ज्ञांच्या मते, लोगोचा दर्जा किंवा शुद्धतेशी कोणताही संबंध नसतो. एकाच चिन्हाखाली विकल्या जाणाऱ्या गोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात घातक रसायनं असू शकतात. म्हणजेच, ‘लोगो पाहून निवड’ ही कल्पना जिवावर बेतू शकते. तरुणाई विशेषतः गडद रंगाकडे आकर्षित होत आहे.
परदेशातही जाळे
एलएसडीची परदेशातून विशेषतः अमेरिकेतून कुरिअरद्वारे पुरवठा होत असल्याची शक्यता आहे. भारतात गोवा, मनाली आणि मुंबई ही प्रमुख वितरण केंद्रे असल्याचे यापूर्वीच्या तपासात समोर आले होते. त्यापाठोपाठ डोके वर काढलेल्या एमडीएमए (एक्स्टसी) या गोळ्यांमागे परदेशी कनेक्शन समोर येत आहे. तसेच राज्यात याचे कुठे उत्पादन होते का? या दिशेने तपास सुरू आहे.
काय आहे समज?
एलएसडीच्या बाबतीतही यापूर्वी असाच ट्रेण्ड दिसून येतो. ब्लॉटिंग पेपरवर नटराज, गौतम बुद्ध, दलाई लामा यांसारखी चित्र छापून ते ‘विशेष’ आणि ‘प्रीमियम’ असल्याचा आभास निर्माण केला जातो. काही तरुणांमध्ये विशिष्ट चित्रांची मागणीही वाढल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, या चित्रांवरून एलएसडीची ताकद किंवा परिणामाचा कालावधी दर्शवला जातो, अशी समज ड्रग्जचे सेवन करण्याऱ्यांमध्ये आहे.