चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 23:56 IST2026-04-21T23:52:24+5:302026-04-21T23:56:36+5:30
अमेरिका आणि इराणमधील तणाव आता युद्धजन्य स्थितीत पोहोचला आहे. चर्चेच्या नावाखाली दोन्ही देशांची जंगी तयारी सुरू असून, आखाती देशांत तणावाचे वातावरण आहे.

चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील चर्चेच्या हालचाली सुरू असतानाच, समुद्रात सुरू असलेल्या कुरघोडीने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. एका बाजूला शांततेसाठी चर्चेचे नाटक सुरू असताना, दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष युद्धभूमीवर दोन्ही देश आपापली ताकद पणाला लावत असल्याचे चित्र आहे.
चर्चेचे गुऱ्हाळ आणि युद्धाचे ढग
इस्लामाबादमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील चर्चेबाबत अद्यापही अनिश्चिततेचे सावट आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेसाठी तयारी दर्शवली असली, तरी अमेरिकेच्या अटी आणि निर्बंधांमुळे इराणने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे, चर्चेच्या पूर्वसंध्येला अमेरिकेने इराणच्या 'टुस्का' या कार्गो जहाजावर ताबा मिळवल्याने दोन्ही देशांतील संबंध अधिकच बिघडले आहेत. अमेरिकेचा दावा आहे की, या जहाजातून क्षेपणास्त्र निर्मितीसाठी लागणारी रसायने आणि उपकरणे पाठवली जात होती.
इराणचा जंगी पवित्रा
अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स कमांडर अहमद वाहिदी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत आक्रमक झाली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, धमक्यांच्या छायेत कोणतीही चर्चा मान्य नाही. इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकन युद्धनौकांकडे ड्रोन पाठवून आपली ताकद दाखवून दिली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये IRGCने पॅराग्लाइडरद्वारे आपला झेंडा फडकवून अमेरिकन सैन्याला इशारा दिला आहे.
युद्ध नौकांचे संचलन
केवळ शब्दांचे युद्ध नाही, तर अमेरिका प्रत्यक्ष लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसते. अमेरिकेने आपले तीन एअरक्राफ्ट कॅरिअर्स इराणच्या दिशेने रवाना केले आहेत. 'यूएसएस अब्राहम लिंकन'सारखी महाकाय युद्धनौका ओमानच्या आखातात तैनात करण्यात आली असून, ती इराणच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे सावट पसरले आहे.
चर्चा फक्त दिखावा?
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही चर्चा केवळ एक औपचारिकता किंवा जागतिक समुदायाला शांत करण्याचा दिखावा असू शकतो. अमेरिकेच्या दबावाला बळी पडण्यास इराण तयार नाही आणि इराणच्या आक्रमकतेपुढे झुकण्यास अमेरिका तयार नाही. अशा स्थितीत चर्चेची ही गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरताना दिसत आहे. जर ही चर्चा फिस्कटली, तर मध्यपूर्वेत भीषण महायुद्ध भडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.