Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:37 IST2026-04-22T08:35:57+5:302026-04-22T08:37:12+5:30

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे दिसत आहे.

Half of the employees in the ministry are on strike, major impact on work | Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम

Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालयातील कामकाजावरही या संपाचा परिणाम दिसून आला. संपाच्या पहिल्या दिवशीच मंत्रालयातील सुमारे निम्मे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने त्याचा फटका कामाच्या निमित्ताने मंत्रालयात आलेल्या अभ्यागतांना बसल्याचे दिसून आले.

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्यानंतरही राज्य सरकारकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप बुधवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभागी होत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे मंत्रालयातील एकूण ७ हजार कर्मचाऱ्यांपैकी मंगळवारी केवळ ३ हजार ६१९ कर्मचारी उपस्थित राहिल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे विविध विभागातील कामांची गती मंदावली होती. या संपामुळे नागरिकांची प्रलंबित कामे आणखी लांबणीवर पडणार आहेत.

महसूलसह महत्त्वाच्या विभागांतील सेवा बाधित 

- सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विशेषतः महसूल, सामान्य प्रशासन, तसेच इतर महत्त्वाच्या विभागातील सेवांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मंगळवार हा साधारण मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दिवस असतो. त्यामुळे हा अंदाज धरुन मंत्रालयात राज्यभरातून अनेक लोक आपल्या कामासाठी गर्दी करतात.

- मंत्रालयात कामानिमित्त अनेक जण आले होते, मात्र अनेकांना या संपाचा फटका बसला. तासन्-तास रांगेत उभे राहून मंत्रालयात प्रवेश मिळवल्यानंतर अभ्यागतांना कर्मचारी संपावर असल्याने मनस्ताप सहन करावा लागल्याचे दिसून आले. 

Web Title : सरकारी कर्मचारियों की हड़ताल: मंत्रालय में आधे कर्मचारी अनुपस्थित, कामकाज बाधित

Web Summary : महाराष्ट्र में सरकारी कर्मचारियों की हड़ताल से नागरिकों पर असर पड़ा, सचिवालय के आधे कर्मचारी अनुपस्थित। राजस्व और प्रशासनिक कार्य बाधित। आगंतुकों को देरी और निराशा का सामना करना पड़ा, अनसुलझे मुद्दे लंबित होने की संभावना।

Web Title : Government Employee Strike: Half Secretariat Staff Absent, Work Disrupted

Web Summary : Maharashtra government employees' strike impacts citizens as half of the secretariat staff are absent. Revenue and administrative work are hampered. Visitors face delays and frustration due to the work stoppage, with unresolved issues likely to linger.