मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:18 IST2026-04-22T09:18:28+5:302026-04-22T09:18:28+5:30
Mumbai Police News: ८ वर्षांच्या मुलीची ताटातूट होताच कुटुंबीयांमध्ये काही क्षणांचा काळ अत्यंत भीतीदायक होता. परंतु, पोलिसांनी तत्परतेने आणि संवेदनशीलतेने सूत्रे हलवली. लहानगीला शोधून काढले आणि पालकांकडे सुखरूप सोपवले.

मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
Mumbai Police News: छत्रपती संभाजीनगर मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील एक लहान मुलगी गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसस्थानकाच्या सबवेत हरवली. मुंबईसारख्या शहरात अचानकपणे आई-वडिलांपासून ताटातुट झाल्याने आणि अनोळखी गर्दीत एकटी पडल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. डोळ्यांत अश्रू, ओठांवर थरथर… स्वतःचे नाव सांगतानाही तिचा आवाज दाटून येत होता. शाळेचे नाव, घराचा पत्ता, आई-वडिलांची माहिती काहीच सांगता येत नव्हते.
सकाळच्या सुमारास पाठीवर काळी बॅग लावलेली, घाबरलेली आणि रडत असलेली एक लहान मुलगी तेथे एकटीच फिरताना दिसली. अशा असहाय्य क्षणी देवदूतासारखी मदत तिच्या मदतीला धावून आली ती म्हणजे पोलिस फौजदार चेतना औतगाडे. त्यांनी मुलीला आधार देत शांत केले, तिची काळजी घेतली आणि त्वरित वरिष्ठांना माहिती दिली. कर्तव्यावर असलेल्या महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांनी तात्काळ तिच्याकडे धाव घेतली. प्रेमाने विचारपूस केल्यानंतर समजले की ती आपल्या आई-वडील, काका-काकी यांच्यासोबत मुंबई फिरण्यासाठी आली होती; मात्र गर्दीत त्यांच्यापासून ती चुकली होती. स्वतःची पूर्ण माहिती सांगता न आल्याने ती अधिकच घाबरलेली होती.
या दरम्यान ही बाब पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यानंतर, मंत्री कार्यालयाचे माध्यम व जनसंपर्क अधिकारी कृष्णदर्शन जाधव यांनी पोलिस यंत्रणांना संपर्क आणि समन्वय साधून रेल्वे आणि मेट्रो परिसरात शोधमोहीम वेगाने राबवण्यात आली. स्थानकावर तसेच परिसरात सातत्याने उद्घोषणा करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे व मिसिंग स्टाफ यांच्या मदतीने सबवे आणि रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवून पालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. आझाद मैदान पोलीस ठाणे येथील ठाणे अंमलदार पो.उप.नि. गडदे मॅडम यांनी मुलीच्या नातेवाईकांची खात्री करून घेतली. काही वेळातच मुलीचे वडील आणि काका तेथे पोहोचले. ओळख पटताच त्या चिमुरडीला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरहून मुंबई पाहण्यासाठी आलेल्या या कुटुंबासाठी काही क्षणांचा हा काळ जरी भीतीदायक होता, तरी शेवटी मुलगी सुखरूप परत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. हरवलेली मुलगी अनाबिया सुलतान मुस्ताक शेख (वय 8 वर्षे) आई-वडिलांच्या कुशीत परत येताच परिसरातील वातावरणही भावूक झाले. मुंबई पोलिसांची सतर्कता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे संभाव्य अनर्थ टळला आणि एका कुटुंबाचे हास्य पुन्हा फुलले. या माणुसकीच्या कार्यासाठी महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील, संबंधित अधिकारी व संपूर्ण पोलिस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांचे फोनवरून कौतुक केले आहे.