"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:39 IST2026-04-22T10:39:15+5:302026-04-22T10:39:45+5:30
Pahalgam Terror Attack : कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे.

"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
कधीकधी वेळ फक्त सरत नाही, तर ती आतपर्यंत जखम देऊन जाते. २२ एप्रिलची तारीख २६ कुटुंबांसाठी भयंकर ठरली आहे, त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या माणसांना गमावलं. आज एक वर्ष उलटलं आहे, पण दुःख तसंच आहे. कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे.
ऐशान्या सांगतात की, त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते, पहलगाममध्ये त्यांच्यासमोरच शुभम यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घरी परतणं, ज्या भिंतींच्या आत शुभम नाहीत तिथे राहणं हे खूप कठीण आहे. अनेकदा त्या शुभमच्या फोटोसमोर बसून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. "मला त्यांना सांगायचं असतं की आज मी काय केलं, मला काय वाटलं... पण ते तिथे नाहीतच. मी त्यांचा आवाज आठवण्याचा प्रयत्न करते, जे खूप कठीण आहे."
"योगी आदित्यनाथ यांची भेट होऊ शकली नाही"
पंतप्रधानांच्या भेटीचा उल्लेख करताना ऐशान्या सांगतात की, त्यावेळी परिस्थिती अत्यंत भावूक होती, त्या आपलं म्हणणं मांडू शकल्या. त्या म्हणतात की, "पंतप्रधानांशी बोलणं झालं, त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं." त्याचबरोबर त्या सांगतात की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट अद्याप होऊ शकलेली नाही. "जेव्हा मुख्यमंत्री योगी आमच्याकडे आले होते, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती की आम्ही त्यांच्याशी काही बोलू शकलो असतो. आता मी अनेक वेळा त्यांचा वेळ मागितला आहे. २-३ वेळा प्रयत्न केला, पण भेट होऊ शकली नाही. मला किमान एकदा त्यांच्यासमोर बसून बोलायचं आहे" असं ऐशान्या सांगतात.
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावून घेतलं"
काश्मीरबद्दल ऐशान्या यांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. पर्यटनामुळे तिथल्या लोकांचे जीवन सुधारेल असं त्या मानतात. "जेव्हा लोकांना योग्य मार्गाने पैसे मिळतील, तेव्हा ते चुकीचा मार्ग का निवडतील?" पण त्याचवेळी त्या हे देखील सांगतात की, काश्मीरची दुसरी बाजूही आहे जिथे काही लोक दहशतवाद्यांना आश्रय देतात. "दोन्ही बाजू आहेत. आता लोकांनी स्वतः ठरवायचं आहे की त्यांनी तिथे जायला हवं की नाही." स्वतःबद्दल त्या स्पष्टपणे सांगतात की, "मी कधीही काश्मीरला जाणार नाही, कारण त्या जागेने माझे सर्वस्व हिरावून घेतलं आहे."
"मी भाग्यवान आहे की मला खंबीर कुटुंब मिळालं"
ऐशान्या मानतात की शुभमचं कुटुंबीय त्यांच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरले. त्या म्हणतात की, "मी भाग्यवान आहे की मला इतकं खंबीर कुटुंब मिळालं आहे. त्यांनी प्रत्येक क्षणी माझी साथ दिली." पण तरीही, एक असा 'सॅच्युरेशन पॉइंट' येतो जेव्हा मनातील दुःख बाहेर येतेच., हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' सारखी मोहीम राबवली. काम सुरू आहे, लष्कर सतत ऑपरेशन्स करत आहे. पण जोपर्यंत दहशतवाद ०.०१ टक्के जरी शिल्लक आहे, तोपर्यंत आपण थांबता कामा नये."
"कोणाचा जीव घेण्याचा अधिकार फक्त देवाला"
दहशतवादाबाबत 'झिरो टॉलरन्स' असायला हवा, असं त्या ठामपणे सांगतात. "जे लोक दहशत पसरवतात किंवा त्याचे समर्थन करतात, त्यांना जगण्याचा अधिकार नसावा." मात्र, त्या हे देखील जोडतात की, "कोणाचा जीव घेण्याचा अधिकार फक्त देवाला आहे, माणसाने माणसाचा जीव घेणं चुकीचं आहे. पण जे दहशतवाद पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे."