Gold Silver Price Today MCX: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर २२ एप्रिल २०२६, बुधवार रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक कमोडिटी बाजारात आज सकाळपासूनच वाढ नोंदवली जात असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धविरामाला मुदतवाढ दिल्याची घोषणा केल्यामुळे ही दरवाढ झाली. आज MCX वर सोन्याचा भाव १,५३,२५३ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४८,८०० रुपये प्रति किलोग्राम झालाय.
सोने आणि चांदी अजून महागणार का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असली तरी ती अनिश्चित काळासाठी आहे, म्हणजेच जोपर्यंत इराणकडून प्रस्ताव दिला जात नाही आणि चर्चा केली जात नाही तोपर्यंत ही अनिश्चितता कायम राहील. अशा परिस्थितीत बाजारपेठेत अनिश्चिततेचं वातावरण वाढू शकतं. सोनं आता केवळ एक धातू राहिलं नसून अनिश्चिततेच्या काळात ते गुंतवणूकदारांसाठी मोठा आधार ठरत आहे, ज्याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावरही होतो. सध्या मॅक्रोइकॉनॉमिक घटकांमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर मोठा दबाव असून ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर त्याचा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो.
कालच्या तुलनेत झालेली दरवाढ
काल MCX वर बाजार बंद होताना सोन्याची किंमत १,५१,६९८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,४४,९१६ रुपये प्रति किलोग्राम होती. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोनं १,२८५ रुपयांनी तर चांदी ३,८८४ रुपयांनी महागली आहे. तुम्ही जर सोने किंवा चांदी खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्या शहरातील २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे भाव नक्की तपासा.
| शहर | २४ कॅरेट | २२ कॅरेट | १८ कॅरेट |
| दिल्ली | ₹1,54,900 | ₹1,42,000 | ₹1,16,210 |
| मुंबई | ₹1,54,750 | ₹1,41,850 | ₹1,16,060 |
| कोलकाता | ₹1,54,750 | ₹1,41,850 | ₹1,16,060 |
| चेन्नई | ₹1,55,990 | ₹1,42,900 | ₹1,18,540 |
| बंगळुरू | ₹1,54,750 | ₹1,41,850 | ₹1,16,060 |
