India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:31 IST2026-04-22T08:45:10+5:302026-04-22T09:31:02+5:30

China Big Tension: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. महिनाभर चाललेल्या भीषण संघर्षानंतर नुकतीच पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत शांतता चर्चा झाली, परंतु २१ तासांच्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघाला नाही.

China Big Tension: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. महिनाभर चाललेल्या भीषण संघर्षानंतर नुकतीच पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत शांतता चर्चा झाली, परंतु २१ तासांच्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे तणाव पुन्हा शिगेला पोहोचला असून विशेषतः होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून (Hormuz Strait) मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

वाढत्या जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात भारत, चीनसह आशियाई देशांना मोठा धक्का दिलाय. इराण युद्धामुळे संयुक्त राष्ट्राने चीन आणि भारताचा आर्थिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. अहवालानुसार, चीनचा विकास दर ५ टक्क्यांहून कमी राहू शकतो, जो त्या देशासाठी मोठा झटका मानला जात आहे.

'यूएन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक'च्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांच्या मते, चीनची अर्थव्यवस्था यावर्षी कमी वेगानं वाढेल. २०२५ मध्ये चीनचा विकास दर ५% होता, जो यावर्षी ४.६% ते ४.३% च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अमेरिका-इराण युद्ध आणि मध्य पूर्वेतील संघर्षामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती हे यामागील मुख्य कारण आहे. वेनेझुएलावर ट्रम्प यांचे नियंत्रण आणि त्यानंतर इराण युद्धामुळे तेल-वायू पुरवठ्यात आलेला अडथळा याचा सर्वाधिक वाईट परिणाम चीनवर झाला आहे, कारण चीन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.

चीनने पहिल्या तिमाहीत ५ टक्क्यांचा विकास दर नोंदवून लवचिकता दाखवली असतानाच हा अंदाज आल्यानं चीनला धक्का बसलाय. चीनचे अर्थमंत्री लॅन फोआन यांनी गेल्या आठवड्यात असा दावा केला होता की, चीनची अर्थव्यवस्था जागतिक विकासाचं इंजिन राहील.

चीनप्रमाणेच संयुक्त राष्ट्राने भारताचा विकास दराचा अंदाजही घटवला आहे. अर्थतज्ज्ञ हमजा मलिक यांच्या मते, गेल्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था ७ टक्क्यांहून अधिक वेगानं वाढली होती. मात्र, यावर्षी मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, गॅसोलीन आणि खतांचे वाढते दर यांचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगावर वाईट परिणाम होऊ शकतो. या कारणांमुळे भारताचा विकास दर गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १ टक्क्यानं घसरून ६ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आशिया-पॅसिफिक क्षेत्र जागतिक आर्थिक विकासाच इंजिन आहे. त्यामुळे या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम केवळ इथल्या देशांवरच नाही, तर संपूर्ण जगावर होतो, असं मलिक यांनी न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेत सांगितलं.

काही दिवसांपूर्वी आशियाई विकास बँकेनंही आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील विकास दराचा वेग मंदावण्याचा अंदाज व्यक्त केला होता. एडीबीच्या अहवालानुसार, हा भाग २०२६ मध्ये ५.१ टक्के विकास दर गाठेल, जो मागील वर्षाच्या ५.४ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. मध्य पूर्वेतील संघर्ष आणि व्यापार क्षेत्रातील अनिश्चितता ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं जात आहे.