शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:44 IST2026-04-22T10:41:10+5:302026-04-22T10:44:33+5:30
America Iran War: मुनीर यांनी नुकत्याच झालेल्या तीन दिवसीय इराण दौऱ्यानंतर पुढाकार घेतला आहे.

शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
America Iran War: पाकिस्तानच्या विनंतीवरून अमेरिका इराणसोबतचा युद्धविराम वाढवत आहे, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणकडून एकत्रित प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. मात्र, अमेरिकन लष्कर होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी सुरूच ठेवेल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यातच शांतता चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न असताना पाकिस्तानच्या असिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केल्याची माहिती आहे.
जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव सादर होत नाही किंवा चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत अमेरिकन लष्कराने होर्मुझवरील नाकेबंदी कायम ठेवावी आणि इतर सर्व बाबतीत सज्ज राहावे, असे निर्देश डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील पथक चर्चेसाठी इस्लामाबादला जाणार आहे. परंतु, इराण अजूनही तयार नाही. यातच पाकिस्तानी लष्कराचे फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक विशिष्ट विनंती केली आहे.
मुनीर यांनी होर्मुझ नाकेबंदीवर चर्चा केली नव्हती
असिम मुनीर यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलून त्यांना सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लादलेली नाकेबंदी आहे, ज्यामुळे इराण चर्चेसाठी इस्लामाबादला जाण्यास तयार नाही. असिम मुनीर यांनी ट्रम्प यांना माहिती दिल्याचे वृत्त असले तरी, काही तासांनंतर व्हाइट हाऊसच्या रिपोर्टरने सांगितले की, मुनीर यांनी होर्मुझ नाकेबंदीवर चर्चा केली नव्हती. विशेष म्हणजे, मुनीर यांनी ट्रम्प यांना केलेला फोन अशा वेळी केला, जेव्हा इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी होण्याची आशा जवळपास मावळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुनीर यांनी नुकत्याच झालेल्या तीन दिवसीय इराण दौऱ्यानंतर पुढाकार घेतला आहे. मुनीर यांनी इराणमध्ये त्यांचे राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी व्हावा, यासाठी पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे.