Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:25 IST2026-04-22T09:24:37+5:302026-04-22T09:25:39+5:30
Mumbai University Paper Leak: मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी. कॉम.च्या सहाव्या सत्राच्या परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका १० ते १५ एप्रिलदरम्यान फुटल्या.

Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी. कॉम.च्या सहाव्या सत्राच्या परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका १० ते १५ एप्रिलदरम्यान फुटल्या. पश्चिम उपनगरातील खासगी क्लासच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर या प्रश्नपत्रिका वितरित झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत विद्यापीठाकडून स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामध्ये टी.वाय. बी.कॉम. सत्र ६ अभ्यासक्रमाच्या परीक्षांना ९ एप्रिलपासून सुरुवात झाली. परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरेही खासगी क्लासेसच्या ग्रुपमध्ये प्रसारित झाल्याचा आरोप आहे. यातील डायरेक्ट व इंडायरेक्ट टॅक्सेस पेपर २ या विषयाच्या १५ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेदरम्यान वांद्रे येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथून विद्यापीठाच्या पथकाने सहा विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कारवाई करून त्यांच्याकडील मोबाईल फोन जप्त केले.
चौकशी समितीची मागणी
परीक्षेदरम्यान कारवाई होऊन आठवडा उलटत आला तरी विद्यापीठाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी काय कारवाई केली याबाबत स्पष्टता दिली नाही. यामुळे आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कलिना संकुलात आंदोलन केले.
विद्यापीठाने या प्रकरणात
तत्काळ गुन्हे दाखल करून संबंधित परीक्षा केंद्रातील जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, प्रश्नपत्रिका फुटलेल्या विषयांच्या परीक्षा तत्काळ रद्द कराव्यात, उच्चस्तरीय चौकशी समिती तत्काळ नेमावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.
पेपरफुटीची व्याप्ती मुंबईभर पसरली?
प्रश्नपत्रिका फुटीची व्याप्ती मुंबईभर असण्याची शक्यता आहे. भाईंदर येथील एका कॉलेजमध्ये केंद्र आलेल्या विद्यार्थ्याने काही प्रश्न परीक्षेच्या १५ मिनिटे आधी मिळाल्याचे सांगितले. तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे परीक्षेच्या १५ मिनिटे आधी केंद्रावरील मित्रांकडून दिली जात होती. विद्यार्थी हातावर उत्तरांचे पर्याय लिहून आणत होते, असे एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
फुटलेले पेपर कोणते?
इकॉनॉमिक्स, कॉमर्स आणि डायरेक्ट व इंडायरेक्ट टॅक्सेस पेपर २ या विषयांचे पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे म्हणणे काय?
विद्यापीठाकडून या प्रकरणात चौकशी सुरू असून ही प्रक्रिया गोपनीय आहे. यात कोणी दोषी आढळल्यास विद्यापीठ प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले.
मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या परीक्षेत ३ विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. विद्यापीठाने नेमलेल्या समितीने वांद्र्यातील आर. डी. नॅशनल कॉलेजमधील ६ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. याबाबत महाविद्यालय प्राचार्य, विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक यांना विचारणा केल्यावर ते प्रकरण दाबत आहेत, असे दिसते. विद्यापीठ प्रशासनाने संशयितांवर लवकर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. तसेच परीक्षा नियंत्रक उत्तर देत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा.
प्रशांत माळी, मुंबई महानगर मंत्री, अभाविप.