Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:24 IST2026-04-22T08:23:50+5:302026-04-22T08:24:17+5:30
US-Iran Conflict: इराणने बुधवारपर्यंत आमच्या अटी मान्य करून करार केला नाही, तर त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार बॉम्बफेक केली जाईल, असा थेट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
इराणने बुधवारपर्यंत आमच्या अटी मान्य करून करार केला नाही, तर त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार बॉम्बफेक केली जाईल, असा थेट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दोन आठवड्यांचा हा तात्पुरता युद्धविराम पुढे वाढवण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला असून, आता इराणकडे फारसा वेळ उरलेला नाही, असेही त्यांनी सीएनबीसी या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. इराणवर पुन्हा बॉम्बफेक होईल, असे मी गृहीत धरून चाललो आहे; कारण, त्यांच्यावर दबाव ठेवायचा असेल तर अशीच रणनीती चर्चेसाठी अधिक फलदायी ठरते, असे ट्रम्प म्हणाले.
मला इराणवर बॉम्ब टाकायला आवडणार नाही; पण, शांततेसाठी त्यांनी चर्चेच्या टेबलावर येणे गरजेचे आहे. जर त्यांनी करार केला, तर ते पुन्हा एकदा एक समर्थ आणि वैभवशाली राष्ट्र बनू शकतात. मात्र, बुधवारी कोणतीही तडजोड न होता मुदत संपली, तर हल्ले करण्यासाठी आमचे सैन्य सज्ज आहे, असा दम ट्रम्प यांनी दिला.
इराणचे लष्कर आधीच उद्ध्वस्त
इराणचे नौदल, हवाई दल आणि प्रमुख नेते संपवले आहेत. हे एक प्रकारे प्रत्यक्ष 'सत्तापालट'च असून, चर्चेशिवाय पर्याय उरलेला नाही, असे ट्रम्प म्हणाले.
यजमान पाकिस्तान इराणच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
- अमेरिका आणि इराणमधील प्रस्तावित दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी इराण उपस्थित राहणार की नाही, याबाबत पाकिस्तान अजूनही औपचारिक प्रतिसादाची वाट पाहत आहे. 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या उच्चस्तरीय वाटाघाटींबाबतची अनिश्चितता अद्याप कायम आहे.
- अमेरिकेने चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स हे इस्लामाबादला पोहोचत आहेत. तर दुसरीकडे इराणकडून मात्र परस्परविरोधी माहिती मिळत आहे. आमचे कोणतेही शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झालेले नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.
- अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी अजूनही कायम ठेवून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातल्याचा आरोपही इराणने केला आहे. जर इराणने चर्चेला नकार दिला, तर अमेरिकेने बॉम्बफेक करण्याचा दिलेला इशारा युद्धाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. पाकिस्तानची मध्यस्थी याच एका प्रतिसादावर रेंगाळली आहे.
शांतता चर्चा ठरणार इराणची 'अग्निपरीक्षा'
चर्चेची ही दुसरी फेरी इराणसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. कारण अमेरिकेशी चर्चेत नक्की किती नमते घ्यायचे, यावरून इराणच्या नेतृत्वात मतभेद आहे. अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याच्या अमेरिकेच्या अटीला कट्टरपंथीयांचा विरोध आहे. इराणच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी निर्बंध उठविणे आवश्यक असल्याचे सुधारणावाद्यांचे मत आहे. मात्र, काही तासांतच लष्कराने ती पुन्हा बंद करून आपली आक्रमकता दाखवून दिली. यावरून सत्तेसाठी रस्सीखेच दिसून आली.
इराणचा तेल टँकर हिंदी महासागरात जप्त
इराणच्या कच्च्या तेलाची तस्करी केल्याप्रकरणी 'एम/टी टिफानी' हा ऑइल टँकर अमेरिकेच्या नौदलाने हिंदी महासागरातील श्रीलंका-इंडोनेशियाच्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात जप्त केला. पेंटागॉनने मंगळवारी ही माहिती दिली.