'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणतो ना? मग जेवताना या चुका टाळाच!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 19, 2021 02:25 PM2021-01-19T14:25:18+5:302021-01-19T14:31:34+5:30

'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' हे बालपणापासून आपल्यावर झालेले संस्कार आहेत. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात देवालाच काय ताटालासुद्धा नमस्कार न करता आपण हाता तोंडाचे युद्ध सुरू करतो. `उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' म्हणजेच जेवण हे पोटभरीसाठी नाही, तर दिवसभराचे काम करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जानिर्मितीसाठी आहे. ही ऊर्जा सकारात्मक स्वरूपात शरीराला प्राप्त व्हावी असे वाटत असेल, तर जेवताना पुढील चुका आवर्जून टाळा.

मांजर, कुत्रा, इ. पाळीव प्राण्यांनी तोंड लावलेले पदार्थ ग्रहण करू नका. त्यांच्या लाळेतून प्राणघातक जंतूंचा प्रवेश होऊ शकतो.

भोजन करताना मरण, रोग, घटस्फोट, हिंसा, हत्या, विष्ठा इ. गोष्टींची चर्चा करू नका. भोजनाच्या वेळी अशा गप्पांमधून उद्भवणाNया रौद्र, किळस, खेद इ. अनिष्ट भावनांचे परिणाम अन्नरसात उतरतात. या विषयांचा स्रोत असणारे मोबाईल, टीव्ही जेवताना बंद ठेवा.

जेवणाचे ताट वाढल्यावर विलंब करू नका. एकतर जेवण गार होते, तसेच सुक्ष्म जीव जंतू वाढलेल्या ताटावर घोंगावतात आणि त्यांच्या माध्यमातून आलेले जीवजंतू अन्नात मिसळतात.

उपासाचा फराळ आणि भोजन एकत्र ठिकाणी वाढू नका. उपास असला, तरी व्यक्तीला मुखाने नाही पण डोळ्यांनी भोजनाचे दर्शन घडू शकते. भोजनाप्रती मनात आसक्ती निर्माण होते आणि उपास मोडल्यासारखे होते.

जेवताना तोंडात घास असताना बोलू नये, तसेच जेवताना हातवारे करू नये. त्यामुळे आपल्या तोंडातून किंवा हाताला लागलेले अन्नकण दुसऱ्याच्या पानात उडण्याची शक्यता असते. तसे करणे ओंगळवाणे ठरते.

जेवताना सावकाश जेवावे. अन्नाचे चांगले पचन होते. सर्व पदार्थांचा आस्वाद घेता येतो आणि भोजनक्रियेचा आनंद पंचेंद्रियांपर्यंत पोहोचतो.

जेवून झाल्यावर पानावरून उठताना ताटाला नमस्कार करून उठावे. ही कृतज्ञता अन्नदात्या परमेश्वराला आणि अन्न पिकवणाऱ्या बळीराजाला असते.

खरकटे हात धुवायला जाताना हात हलवत जाऊ नये. हाताला लागलेले अन्नकण इतरत्र पडून कोणाच्या पायाखाली येऊ नयेत, हा त्यामागील हेतू असतो.