Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 07:42 IST2026-04-19T07:41:19+5:302026-04-19T07:42:18+5:30
गेल्या दोन वर्षांपासून एकीकडे देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असली तरी दुसरीकडे प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या प्रकारांतदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.

Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
मनोज गडनीस
विशेष प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून एकीकडे देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असली तरी दुसरीकडे प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या प्रकारांतदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. विमानाला विलंब झाला तर विमानतळावर गोंधळ घालणे, विमान प्रवासादरम्यान केबिन कर्मचाऱ्यांशी केवळ हुज्जत घालणेच नव्हे तर हाणामारी करणे. केबिन कर्मचारी महिला तसेच वैमानिकाला शिवीगाळ करणे, विमानात धूम्रपान करणे, विमानात मद्यप्राशन करून लघुशंका करणे या आणि अशा अनेक घटना गेल्या दोन वर्षांत घडल्या आहेत. या प्रकरणांची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतली असून, आता अशा प्रवाशांवर कडक कारवाई करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा तयार केला आहे.
हा मसुदा विमान कंपन्यांनादेखील पाठवण्यात आला असून, त्यांच्या सूचना आल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. हा नवा मसुदा अंतिम झाला की, गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर त्यांच्या गैरवर्तनाच्या प्रकारानुसार किमान तीस दिवस ते कमाल दोन वर्ष किंवा त्याहीपेक्षा अधिक काळाची प्रवास बंदी लागू होणार आहे. या प्रस्तावित नियमांनुसार, एखाद्या प्रवाशाने जर गैरवर्तन केले तर संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती चेक-इन काउंटर किंवा विमानतळावर तैनात तपास यंत्रणांना तातडीने कळविणे गरजेचे आहे. प्रवाशाने केलेल्या गैरवर्तनाच्या गांभीर्यानुसार त्याच्यावर देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचा शिक्कादेखील मारण्यात येणार आहे. अशा प्रवाशाची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला तसेच अन्य विमान कंपन्यांनादेखील कळवावी लागणार आहे. जेणेकरून संबंधित प्रवासी अन्य विमानातून प्रवास करू शकणार नाहीत.
अशी असेल कारवाई
विमानतळावर आल्यापासून विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवरील कारवाईसाठी चार पातळ्या निश्चित केल्या आहेत.
पहिली पातळी : शिवीगाळ, हुज्जत- याकरिता किमान तीन महिन्यांपर्यंत संबंधित प्रवाशांवर विमान प्रवासबंदी लागू होईल.
दुसरी पातळी : शारीरिक हिंसाचार- तीन महिने ते सहा महिने विमान प्रवासबंदी लागू होईल.
तिसरी व चौथी पातळी : जीवे मारण्याची धमकी देणे किंवा विमानाला इजा पोहोचेल अशी पद्धतीची कृती करणे- किमान दोन वर्षे ते गुन्ह्याच्या प्रकारानुसार कितीही काळ किंवा कायमस्वरूपी विमान प्रवास बंदी लागू होईल.
विमान कंपन्याकडून काय आहेत किमान अपेक्षा?
अर्थात, एकीकडे नियम जरी कडक होणार असले तरी दुसरीकडे विमान कंपन्यांनीदेखील आपली सेवा देताना प्रवाशांची सर्वोत्तम काळजी घ्यावी, असा सूर प्रवाशांकडून लावण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली तरी प्रवासीसंख्या आणि विमान सेवा हे गणित अद्यापही व्यस्त प्रमाणात आहे. त्यामुळे विमानांना विलंब होणे किंवा विमान ऐनवेळी रद्द होणे, या प्रकारातदेखील वाढ झाली आहे. अशावेळी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीदेखील ही परिस्थिती संयतपणे हाताळून प्रवाशांना योग्य माहिती देतानाच त्यांची अनुकूल सोय करण्याची गरज प्रवासी व्यक्त करत आहे. अर्थात, परिस्थिती कितीही गंभीर झाली तरी प्रवाशांनी किमान आपला संयम न सोडणे महत्त्वाचे आहे.