Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 06:41 IST2026-04-19T06:40:32+5:302026-04-19T06:41:07+5:30
IMD Forecast: राज्याला घाम फोडणाऱ्या कमाल तापमानानंतर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट उभे राहिले आहे.

Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्याला घाम फोडणाऱ्या कमाल तापमानानंतर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची चिन्हे असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने घाट परिसर, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान राहील. मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील शहरांचे तापमान
| शहर | तापमान (अंश सेल्सिअस) |
| अमरावती | ४४.४°C |
| गडचिरोली | ४४.०°C |
| वाशिम | ४४.०°C |
| चंद्रपूर | ४३.६°C |
| नागपूर | ४३.६°C |
| वर्धा | ४३.५°C |
| गोंदिया | ४२.९°C |
| यवतमाळ | ४२.८°C |
| सोलापूर | ४२.४°C |
| परभणी | ४२.२°C |
| जळगाव | ४१.४°C |
| धाराशिव | ४१.४°C |
| बुलढाणा | ४१.२°C |
| अकोला | ४१.१°C |
| बीड | ४१.१°C |
| मालेगाव | ४०.६°C |
| छत्रपती संभाजीनगर | ४०.६°C |
| सांगली | ४०.०°C |
मुंबई ३४.३ अंशांवर
वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत शुक्रवारी ३३.१ अंश सेल्सियस इतके तापमात होते. शनिवारी यात एक अंशाची वाढ होऊन मुंबईत ३४.३ एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले.
कुठे कुठे पडणार पाऊस?
१९ एप्रिल: महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खान्देश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांत दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.
२० व २१ एप्रिल: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडेल. २२ तारखेला वादळी पावसाचे क्षेत्र आणि त्याच्या तीव्रतेत घट होईल.
उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट, मध्यम पावसाची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ