ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 22:09 IST2026-04-17T22:09:00+5:302026-04-17T22:09:34+5:30
नागरिक विकास समितीतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजिवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाशिक येथील ‘टीसीएस’मधील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण गाजत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असे प्रकार होत आहे हे वाईट आहे. मात्र मी अगोदर काम करत असलेल्या ॲक्सिस बॅंकेतदेखील अशा घटना घडल्या होत्या. मात्र योग्य वेळी तक्रारी झाल्याने संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते, असे त्या म्हणाल्या. नागरिक विकास समितीतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजिवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.
कॉर्पोरेट क्षेत्रात असे प्रकार होत असल्याचे ऐकून मला वाईट वाटत आहे. ॲक्सिस बॅंकेत मी काम करत असतानादेखील अशी प्रकरणे झाली होती. मात्र व्हिसल ब्लोईंगमुळे अशा आरोपींनवर कायदेशीर कारवाई व कॉर्पोरेट कारवाई झाली होती. असे प्रकार झाले की तातडीने ते व्हिसल ब्लोईंगच्या माध्यमातून समाजाला सांगणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरिष्ठांना ते कळविले पाहिजे. तरच हे प्रकार बंद होऊ शकतील, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महापौर नीता ठाकरे, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मनाली क्षीरसागर, विजया मारोतकर प्रामुख्याने उपस्थित होते.
लव्ह जिहाद प्रकरण भयानकच, मुलींनी सावध राहण्याची गरज
परतवाडा येथील सेक्स स्कॅंडलच्या मुद्द्यावरदेखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. लव्ह जिहाद प्रकरण भयानकच असून मुलींनी सावध राहण्याची गरज आहे. लव्ह जिहादसारख्या प्रकरणांवर योग्य कारवाई होत आहे. परंतु आता मुलींनी जास्त सावध राहण्याची गरज आहे. आपली संस्कृती प्रेमाने फॉलो केली तर असं होणार नाही. आपल्या तरुणाईकडे स्वत:च्या वेद-पुराणांची बॅकिंग नाही. त्यामुळे ते संभ्रमित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भारतीय मूल्यसंस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचविले पाहिजे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. अशोक खरात प्रकरणदेखील भयानक आहे. खरातने त्याची बुद्धी व प्रभावा याचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी केला आणि महिलादेखील त्याला बळी पडल्या याचे दु:ख वाटते. खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे प्रत्येक महिलेला वाटत आहे, असे त्या म्हणाल्या.
महिला आरक्षणाला काही लोकांचा विरोध
राजकारणात महिलांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी ३३ टक्के आरक्षण आवश्यकच आहे. या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र महिलांना हक्काचा वाटा मिळणे आवश्यक आहे. महिलांचा या विधेयकाला पाठिंबा आहे, असे त्या म्हणाल्या.