नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2026 21:48 IST2026-04-17T21:47:23+5:302026-04-17T21:48:07+5:30
Nashik TCS case: निदा खान गेल्या दोन महिन्यांपासून मुंब्रा येथील अमृतनगर भागात पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती.

नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
- जितेंद्र कालेकर
मुंब्रा, ठाणे : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट लैंगिक छळवणूक प्रकरणातील आरोपी निदा खान दोन महिन्यांपासून ठाण्यातील मुंब्रा भागात वास्तव्याला होती, अशी माहिती आता पुढे आली आहे. तिचा पती मोईन खान (२७) याची शुक्रवारी नाशिक गुन्हे शाखेने मुंब्रा पाेलिस ठाण्यात चौकशी केली. मोईन याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉर्पोरेट लैंगिक छळवणूक प्रकरणात नाशिकच्या कंपनीतील कर्मचारी महिला आणि आरोपी निदा हिच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तिच्या माहेरचे नाव निदा एजाज खान तर सासरचे नाव निदा मोईन नविद खान (वय २६) असे आहे. ती फरार असल्याने तिच्या चौकशीसाठी मुंब्रा भागात राहणारा तिचा पती मोईनला ताब्यात घेत नाशिक गुन्हे शाखेने शुक्रवारी चौकशी केली.
मूळची अशोकामार्ग नाशिक येथील ती रहिवासी असून, टीसीएस कंपनीत कामाला होती. तर पती मोईन हा मुंब्रा येथील एका कंपनीत लॉजिस्टिक ऑफिसर म्हणून काम करतो. तो फेब्रुवारी महिन्यात अमृतनगर, मुंब्रा येथे भाड्याने घर घेऊन राहत होता. त्यानंतर त्याची पत्नी निदा हिने मुंबईला बदली करून घेतली होती. त्यानंतर ती त्याच्यासोबत मुंब्रा येथे राहत होती. ती टीसीएस कंपनीच्या मालाड येथील कार्यालयात जात होती. ९ एप्रिल २०२६ रोजी कामावरून कमी केल्याची नोटीस तिला कंपनीने दिली. त्यानंतर तिची मावशी नुरी शेख तिला दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे घेऊन गेल्याचे चौकशीत पती मोईन याने सांगितले. मोईन यास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तो काम करीत असलेल्या एडब्ल्यूएस या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.