निर्णय घेताना गोंधळता? या सहा गोष्टी करून पहा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 19, 2021 01:28 PM2021-01-19T13:28:33+5:302021-01-19T13:36:51+5:30

'निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असले पाहिजे' असे प्रख्यात लेखक व.पु.काळे म्हणतात. परंतु, नुसते स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही, मनुष्याच्या ठायी निर्णयक्षमताही असावी लागते. ती नसेल, तर मनुष्य गोंधळू शकतो. यासाठी आपले अध्यात्मिक आणि मानसिक बळ सक्षम असायला हवे. आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य, हे आपल्या कृतीतून सिद्ध होते. निर्णयाच्या क्षणी मनात द्वंद्व निर्माण होत असेल, तर त्यासाठी काही गोष्टींचा सातत्याने सराव करायला हवा. तरच आपली निर्णयक्षमता वाढू शकेल.

आपल्या दैनंदिन सवयींवर आपली निर्णयक्षमता अवलंबून असते. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, कोणते नंतर करायचे, कोणत्या कामाचे महत्त्व अधिक आहे, कोणते नाही ही छोट्या छोट्या कामांची आखणी आपल्या निर्णयप्रक्रीयेत मदत करते. आयुष्यातले मोठे निर्णय घेताना या सरावाचा फायदा होऊन आपण प्राधान्यक्रम ठरवू शकू.

काय करायचे आहे ठरल्यावर ते कसे करायचे आहे, याबाबत आपल्याकडे सविस्तर माहिती हवी. मुद्दाम सविस्तर हा शब्द वापरला आहे. कारण तुटपुंजा माहितीवर केलेले काम कधीच सरस होत नाही. म्हणून विषयाची खोल माहिती हवी. म्हणजे निर्णयाला योग्य दिशा मिळते.

जे काम करायचे आहे, त्याप्रती आपल्या मनात नक्की काय भावना आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या कामाकडे आपण रतीब म्हणून पाहतो, की कर्तव्य यावर कामाची गुणवत्ता ठरते. कर्तव्यबुद्धीने केलेल्या कामांना मेहनतीची झळाळी असते. निर्णयप्रक्रीयेत कर्तव्यबुद्धी अतिशय महत्त्वाची ठरते.

जीव ओतून काम करायचे, तर त्यात भावनांची गुंफण हवी. परंतु, भावनेच्या आहारी न जाता वास्तववादी दृष्टीकोनही ठेवला पाहिजे. अवास्तव कल्पनांच्या मागे धावत बसलो, की निर्णय चुकतात आणि वेळ, श्रम वाया जातात.

आपल्या विचारांकडे सकारात्मक दृष्टीने बघा. सकारात्मक दृष्टीकोन आपल्या ठायी असलेला आत्मविश्वास वाढवतो. जोवर स्वत:वरचा विश्वास वाढत नाही, तोवर दुसऱ्यांना आपल्याप्रती आणि आपल्या कामाप्रती विश्वास वाटणार नाही. निर्णयप्रक्रीयेत आशावादी असणे महत्त्वाचे आहे. ही ऊर्जा कामाला वेग देते आणि अपयशातून मार्ग दाखवते.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे निर्णय योग्य अयोग्य नसतो. तो योग्य सिद्ध करावा लागतो. त्यासाठी प्रयत्नांशी तडजोड करून चालत नाही. विविध प्रकारच्या वैध मार्गांचा अवलंब करावा लागतो. सर्जनशीलता जागृत ठेवून कामाचे पर्याय शोधावे लागतात. नाविन्य निर्माण करावे लागते, तरच कामात रसोत्पत्ती होऊन काम पूर्णत्वाला जाते. विचारातून कृतीकडे यायचे असेल आणि अचूक निर्णय घ्यायचा असेल, तर वरील मुद्द्यांवर काम करायला हवे. नव्हे तर ती सवयच लावून घ्यायला हवी. तसे केल्याने तुमचे निर्णय कधीही चुकणार नाहीत आणि चुकलेच तरी ते दुरुस्त करण्याचा आत्मविश्वास तुमच्यात उत्पन्न होईल.