लग्नानंतर नात्यातील गोडवा संपवणाऱ्या ६ वाईट सवयी! वेळीच सावध व्हा, अन्यथा पश्चात्तापाची येईल वेळ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2026 20:00 IST2026-04-21T20:00:00+5:302026-04-21T20:00:02+5:30
6 bad habits that can ruin your marriage : signs your habits are hurting your relationship : habits that destroy relationships : सुखी संसार क्षणात मोडू शकतात या ६ 'छोट्या' सवयी, तुम्हीही या चुका करताय का?

6 bad habits that can ruin your marriage
'लग्न' हे केवळ दोन व्यक्तींमधील कायदेशीर प्रक्रिया किंवा सामाजिक करार नाही, तर ती दोन मनांना जोडणारी एक रेशमी गाठ आहे. ही गाठ जितकी घट्ट, मजबूत वाटते, तितकीच ती नाजूकही असते. जेव्हा एखाद नात तुटत, तेव्हा आपल्याला वाटते की त्यामागे नक्कीच एखादे मोठे कारण, मोठा वाद किंवा फसवणूक कारणीभूत असेल. पण लग्नाच्या बाबतीत एक कटू सत्य असे आहे की, मोठ्या संकटांपेक्षा छोट्या दुर्लक्षित गोष्टीच नात्याचा पाया हळूहळू कमकुवत करत असतात.

signs your habits are hurting your relationship
आपण अनेकदा बाहेरील जगाशी जुळवून घेताना खूप संयम दाखवतो, पण घरात आपल्या जोडीदाराशी वागताना नकळत अशा काही चुका करतो ज्या आपल्याला क्षुल्लक वाटतात. पण याच छोट्या चुका, ज्याला आपण सवय किंवा स्वभाव म्हणतो, त्या एखाद्या वाळवीप्रमाणेच संसाराला आतून पोखरू लागतात.

relationship advice to save marriage
जगातील नामवंत रिलेशनशिप एक्सपर्ट डॉ. जॉन गॉटमॅन यांच्या मते, नात्यात वाद होणे ही समस्या नाही, तर ते वाद आपण कसे सोडवतो हे महत्त्वाचे आहे. मग अशा कोणत्या ६ छोट्या सवयी आहेत, ज्या सुखी संसाराला विनाशाकडे नेतात? ते पाहूयात.

१. जोडीदाराला गृहीत धरणे :-
लग्नाला काही वर्षे उलटल्यानंतर, अनेक जोडपी एकमेकांच्या अस्तित्वाला अगदीच सामान्य मानू लागतात. सुरुवातीच्या काळात एकमेकांसाठी आवर्जून केल्या जाणाऱ्या गोष्टी हळूहळू कमी होतात. एकमेकांना 'थँक्यू' (धन्यवाद) म्हणणे किंवा त्यांच्या छोट्या-छोट्या कामांचे कौतुक करणे पूर्णपणे थांबते. डॉ. जॉन गॉटमॅन यांच्या मते, कौतुकाचा अभाव हे नात्यात दुरावा निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करता किंवा ते त्याचे 'कर्तव्यच' आहे असे समजून चालता, तेव्हा त्या व्यक्तीला नात्यात एकटेपणा जाणवू लागतो. ही भावना हळूहळू जोडीदाराला तुमच्यापासून मानसिकदृष्ट्या लांब नेते.

२. सायलेंट ट्रीटमेंटचा वापर :-
जोडीदारावर नाराज झाल्यावर त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद करणे किंवा त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करणे हे कोणत्याही नात्यासाठी विषासारखे काम करते. जेव्हा तुम्ही संवाद थांबवता, तेव्हा समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गुंतागुंतीची आणि गंभीर होत जाते. गप्प राहून किंवा जोडीदाराला टाळून तुम्ही त्याला मानसिक तणाव देता. यामुळे नात्यातील भावनिक ओलावा हळूहळू संपू लागतो. डॉ. गॉटमॅन यांच्या मते, संवाद थांबवणे म्हणजे नात्याची दारे बंद करण्यासारखे आहे, ज्यामुळे जोडीदाराच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

३. इतरांशी तुलना करणे :-
सोशल मीडियाच्या आजच्या काळात इतरांशी तुलना करणे ही एक मानसिक समस्या बनली आहे. आपल्या जोडीदाराची तुलना इतरांच्या पतीशी किंवा पत्नीशी करणे, किंवा दुसऱ्यांचे घर आणि लाईफस्टाईल पाहून आपल्या जोडीदारात उणिवा काढणे, हे नात्याच्या सन्मानाला धक्का लावणारे असते. प्रत्येक माणूस आणि प्रत्येक नाते वेगळे असते. सोशल मीडियावर दिसणारे चित्र नेहमीच खरे नसते. जेव्हा तुम्ही तुलना करता, तेव्हा तुमच्या मनात असंतोष निर्माण होतो आणि जोडीदाराचा आत्मविश्वास कमी होतो. यामुळे नात्यातील आदर संपतो आणि एकमेकांबद्दलची ओढ कमी होऊ लागते.

४. प्रत्येक वादात 'जिंकण्याचा' प्रयत्न करणे :-
नात्यात छोटे-मोठे वाद होणे सामान्य आहे, पण प्रत्येक वादात आपणच 'योग्य' आहोत हे सिद्ध करण्याची जिद्द अत्यंत धोकादायक असते. जर तुमच्यातील संवाद वारंवार "कोण जिंकलं आणि कोण हरलं?" यावर येऊन थांबत असेल, तर लक्षात ठेवा की दिवसाअखेरीस पराभव तुमच्या नात्याचाच होत आहे. नात्यात सुसंवाद टिकवण्यासाठी 'मी' पेक्षा 'आपण' या भावनेला अधिक महत्त्व देणे गरजेचे असते. वादाचा उद्देश समोरच्याला हरवणे हा नसून, समस्येवर तोडगा काढणे हा असायला हवा. जेव्हा तुम्ही जिंकण्याचा हट्ट धरता, तेव्हा तुमचा जोडीदार मानसिकदृष्ट्या हरलेला असतो आणि ही भावना नात्यात दुरावा निर्माण करते.

५. फोन आणि स्क्रीनला अतिवेळ देणे :-
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जोडीदाराशी संवाद साधण्याऐवजी इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करण्यात मग्न असता का? आजच्या काळात 'फबिंग' (Phubbing) - म्हणजेच जोडीदारासमोर असूनही त्याला दुर्लक्ष करून फोनवर व्यस्त राहणे - हे घटस्फोटाचे एक मोठे कारण बनत आहे. जेव्हा तुम्ही जोडीदाराला पुरेसा वेळ देत नाही, तेव्हा त्यांना स्वतःबद्दल असुरक्षित वाटू लागते आणि आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांच्या मनात घर करते.

६. जुन्या गोष्टी उकरून काढणे :-
एखाद्या ताज्या वादात ५ वर्षांपूर्वीच्या चुकांचा उल्लेख करणे, नात्याला कधीही पुढे जाऊ देत नाही. जुन्या तक्रारींचे ओझे वाहत राहिल्यामुळे मनावरचा ताण वाढतो. मानसशास्त्रातील (Psychology Today) संशोधनानुसार, जे जोडपे जुन्या गोष्टी विसरून एकमेकांना माफ करतात आणि पुढे जातात, त्यांचे वैवाहिक आयुष्य अधिक यशस्वी आणि सुखी असते.

७. नाते कसे सुधारावे? :-
जर वर सांगितलेल्या चुकांपैकी कोणतीही चूक तुमच्याकडून होत असेल, तर ती मान्य करून आजच तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा. दररोज किमान १५ मिनिटे फोन बाजूला ठेवून एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारा. जोडीदाराने केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मनापासून 'धन्यवाद' म्हणा. जुन्या चुकांवर पडदा टाकून नव्या सुरुवातीचा प्रयत्न करा. या ६ सवयी दिसायला जरी छोट्या वाटत असल्या, तरी त्यांचा परिणाम खोलवर होतो. या चुका वेळीच सुधारल्या तर तुमच्या नात्यात तोच जुना गोडवा, आदर आणि प्रेम नक्कीच परत येईल.

















