वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 21:57 IST2026-04-21T21:56:45+5:302026-04-21T21:57:36+5:30

वसई तहसील कार्यालयातील कारभाराला पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे ग्रहण लागले आहे.

Vasai Tehsil again caught in bribery scam; Private individual arrested while accepting bribe of Rs 7 lakh | वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात

वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात

नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसई तहसील कार्यालयातील कारभाराला पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे ग्रहण लागले आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी आणि जमिनीच्या एन.ए. (बिगर शेती) प्रक्रियेसाठी तब्बल ४० लाखांची मागणी करून तडजोडीअंती ७ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी इसमाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत अपर तहसीलदार (अकृषिक) विनोद बाळकृष्ण धोत्रे यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एसीबीच्या पथकाने खासगी इसम अनिल प्रभाकर चौबल याला ताब्यात घेतले असून, तहसीलदार विनोद धोत्रे हे सध्या नॉट रिचेबल असून त्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकाम निष्कासित न करण्यासाठी आणि सदर जागा एन.ए. करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या मोबदल्यात अपर तहसीलदार कार्यालयातील बाह्य कर्मचारी असलेला अनिल चौबल याने तक्रारदाराकडे मोठ्या रक्कमेची मागणी केली होती. सुरुवातीला ४० लाखांची मागणी केल्यानंतर, तडजोडीअंती ७ लाखांची रक्कम निश्चित करण्यात आली. मंगळवारी, २१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही रक्कम स्वीकारताना अनिल चौबल याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे वसई महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

वसई तहसील आणि महसूल कार्यालयाचा इतिहास पाहता, भ्रष्टाचार ही या विभागाला लागलेली जुनी कीड असल्याचे दिसून येते. यापूर्वीही अनेकदा या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकले आहेत. २००७ मध्ये तत्कालीन तहसीलदार, २०१० मध्ये तहसीलदारांचा लिपिक तर २०२० मध्ये एका तहसीलदारावर लाचखोरीप्रकरणी झालेली कारवाई यांसारख्या अनेक घटनांनी वसईतील महसूल विभाग वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सातत्यपूर्ण घटनांमुळे वसईतील सरकारी कार्यालयांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, 'भ्रष्टाचारमुक्त प्रशासन' या सरकारी दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.

एसीबीच्या ठाणे परिक्षेत्राकडून वारंवार जनजागृती केली जात असूनही, लाचखोरांवर वचक बसत नसल्याचेच या ताज्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. आता या प्रकरणात अपर तहसीलदार विनोद धोत्रे यांच्या भूमिकेचा तपास आणि या रॅकेटमध्ये अजून कोणकोणते बडे मासे सहभागी आहेत, याचा शोध एसीबी घेणार आहे. वसई-विरार पट्ट्यातील नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध अधिक सतर्क राहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Web Title : वसई तहसीलदार रिश्वत मामला: निजी एजेंट गिरफ्तार, अधिकारी जांच के दायरे में

Web Summary : वसई तहसीलदार कार्यालय फिर से भ्रष्टाचार के आरोपों से घिरा। भूमि मंजूरी के लिए ₹7 लाख की रिश्वत लेते हुए एक निजी एजेंट गिरफ्तार। एक अधिकारी जांच के दायरे में है। यह घटना वसई राजस्व विभाग में जारी भ्रष्टाचार के मुद्दों को उजागर करती है, जिससे रिश्वतखोरी के खिलाफ अधिक सतर्कता बरतने का आह्वान किया गया है।

Web Title : Vasai Tehsildar Bribe Case: Private Agent Arrested, Official Under Investigation

Web Summary : Vasai Tehsildar's office faces corruption allegations again. A private agent was arrested accepting a ₹7 lakh bribe for land clearances. An official is under investigation. This incident highlights ongoing corruption issues within the Vasai revenue department, prompting calls for increased vigilance against bribery.