एवढा पैसा कुठून आला? इंदुरीकर महाराजांनी जाहीरपणे सांगितला मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा हिशोब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:56 IST2026-05-04T13:38:54+5:302026-05-04T13:56:48+5:30

kirtankar indurikar maharaj: आपल्या मुलीचा विवाह दिमाखात पार पाडून इंदुरीकर महाराजांनी काय बोंबलायचं ते बोंबला म्हणत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या रोकठोक कीर्तनशैलीने समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निमित्त आहे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाहसोहळा.

३ मे रोजी संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. मात्र, या विवाहाच्या खर्चावरून सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला महाराजांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून, खर्च कोणी केला? याचा मोठा खुलासाही केला आहे.

उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी यांचा हा विवाह सोहळा फक्त कौटुंबिक सोहळा न ठरता त्याला राजकीय सोहळ्याचे स्वरूप आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील यांसह वारकरी संप्रदायातील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती.

साखरपुड्याच्या वेळी झालेल्या टीकेचा वचपा काढत इंदुरीकर महाराजांनी लग्नावरुन टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

"काही लोकांना नासकी प्रवृत्तीची सवय असते. तुम्ही सोन्याची नळी लावली तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही, तशी ही माणसे आहेत. समाजात अशा लोकांचीही गरज असते, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला आपल्या चुका कळतात."

एवढा पैसा आणला कुठून? या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना महाराजांनी सांगितले की, "माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी या लग्नाचा ९० टक्के खर्च केला आहे. देशमाने, कातोरी यांसारख्या हितचिंतकांनी हा भार उचलला.

"गेल्या २६ वर्षांत मी कोणाशीही पैशाचा व्यवहार केलेला नाही. त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच उरत नाही. देणाऱ्यांनी आनंदाने दिले आहे, मग इतरांना चर्चा करण्याचे कारण काय?"

नेहमी साध्या लग्नाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न शाही थाटात का करतात? या टीकेला उत्तर देताना त्यांनी आपल्या कार्याची आठवण करून दिली.

"आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. भव्य मंदिर बांधले, पंधराहून अधिक शिक्षक नेमून मोफत विद्यालय चालवतो. जिथे मी एक रुपया फी घेत नाही, तिथे कोणीही माझ्या खर्चावर बोट ठेवू नये," असे त्यांनी ठणकावून सांगितले.

"कीर्तनाच्या व्यापापामुळे मी मुलाला तीन-तीन वर्षे भेटू शकत नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी थाटात लग्न करायला काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, आता या लग्नाची चर्चा वर्षभर होईल," असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला.