“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:27 IST2026-05-08T17:25:49+5:302026-05-08T17:27:38+5:30
MP Sanjay Raut Letter To America President Donald Trump: संजय राऊत यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिले आहे.

“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
MP Sanjay Raut Letter To America President Donald Trump: एकीकडे अमेरिका इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे वाढलेली महागाई आणि दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यात होत असलेला करार यावरून भारतातील विरोधक सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतरही विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्याचा जाब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला आहे. यासाठी संजय राऊतांनी थेट एक पत्र लिहिले आहे.
भारतात आता झालेल्या निवडणुका राज्य स्तरावरील असून, हा भारताच्या फेडरल लोकशाहीचा अंतर्गत विषय आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बाह्य समर्थनाचे विधान अकाली आणि अवाजवी वाटते. महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणूक प्रक्रियेबाबत काही गंभीर विषय समोर आले आहेत. भीतीचे वातावरण, धमक्या देणे आणि दबावतंत्र वापरल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने निःपक्ष काम केलेले नाही, आयोगाची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या फायद्याची होती, अशी धारणा जनमानसात आहे, ज्यामुळे घटनात्मक संस्थांच्या तटस्थतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विधान करण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार केला होता का?
बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय दलांचे जवान तैनात करण्यात आले होते. याबाबत देखील अनेक आरोप करण्यात आले यामुळे मतदारांमध्ये विश्वासाऐवजी दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका घेणे नव्हे, तर त्या निवडणुका मुक्त, न्याय्य आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. जेव्हा गंभीर आरोप केले जातात, तेव्हा ते उत्सवाचा नाही तर सखोल चौकशीचा विषय ठरतात. आपण विधान करण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार केला होता का?, अशी विचारणा संजय राऊतांनी या पत्रातून केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याची भूमिकेचेही समर्थन केले. ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाचाच तो एक भाग आहे. यामध्ये इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर उभी आहे, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
Dear President @realDonaldTrump
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 8, 2026
Greetings.
As a Member of Parliament from India, I write in response to reports of your congratulations to PM Narendra Modi on the West Bengal Assembly election results.
These are state-level elections—an internal matter of India’s federal…