Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:20 IST2026-05-09T13:10:56+5:302026-05-09T13:20:25+5:30

परदेश वारीचं स्वप्न आता बजेटमध्ये! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया ठरतोय 'किंग'; कमी खर्चात करा आलिशान सफर!

अनेकांना परदेशात फिरायला जाण्याची ओढ असते, पण डॉलर किंवा युरोचे वाढते दर पाहून बजेट कोलमडते. मात्र, जगात असेही काही देश आहेत जिथे भारतीय रुपयाची ताकद खूप जास्त आहे. या देशांमध्ये गेल्यावर तुम्हाला महागाईची भीती वाटणार नाही, उलट तिथे राहणे, फिरणे आणि खाणे पिणे अत्यंत स्वस्त पडते. दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांसह अशा ७ देशांची ही यादी, जिथे तुम्ही 'राजा'सारखे फिरू शकता.

श्रीलंका : भारताच्या सर्वात जवळ असलेला हा देश बजेट ट्रिपसाठी बेस्ट आहे. येथे १ रुपया म्हणजे ३.५ ते ३.८ श्रीलंकन रुपये. समुद्रकिनारे, मंदिरं आणि चहाचे मळे पाहण्यासाठी श्रीलंकेची ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता.

पराग्वे : जर तुम्हाला दक्षिण अमेरिका फिरायचे असेल, तर पराग्वे हा सर्वात स्वस्त देश आहे. येथे १ रुपया म्हणजे ९० ते ९५ गुआरानी. येथील स्थानिक बाजारपेठा आणि खाद्यसंस्कृती पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

उज्बेकिस्तान : इस्लामिक वास्तुकलेचा नमुना असलेल्या उज्बेकिस्तानमध्ये १ रुपयाच्या बदल्यात १४० ते १५० सोम मिळतात. ऐतिहासिक शहरांची सफर आणि ट्रेनचा प्रवास येथे खूपच स्वस्त आहे.

कंबोडिया : अंगकोर वाट सारख्या जगप्रसिद्ध मंदिरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंबोडियात १ रुपया म्हणजे ४८ ते ५० कंबोडियन रिएल. ऐतिहासिक वास्तू पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे स्वस्त आणि मस्त ठिकाण आहे.

लाओस : गर्दीपासून दूर जायचे असेल तर लाओस हा उत्तम पर्याय आहे. येथे १ रुपयाची किंमत सुमारे २४० ते २५० लाओ किप इतकी आहे. येथील युनेस्को हेरिटेज साईट्स आणि डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.

इंडोनेशिया : भारतीयांचे आवडते ठिकाण म्हणजे बाली. इंडोनेशियामध्ये १ रुपयाच्या बदल्यात १८५ ते १९० इंडोनेशियन रुपिया मिळतात. यामुळे तिथे तुम्ही एखाद्या प्रीमियम रिसॉर्टमध्ये राहूनही खिशाला जास्त कात्री लागत नाही.

व्हिएतनाम : भारतीय पर्यटकांसाठी व्हिएतनाम सध्या हॉट डेस्टिनेशन बनले आहे. येथे १ भारतीय रुपया म्हणजे तब्बल ३०० वियतनामी डोंग. हनोई, हा लॉन्ग बे यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही अत्यंत कमी खर्चात फिरू शकता. येथील हॉटेल आणि ट्रान्सपोर्टचे दर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.