भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा यांना राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडा कडून नोटीस बजावण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंवर ‘वेअरअबाउट्स फेल्योर’ नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान, यशस्वी जैस्वाल आणि शेफाली वर्मा यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीनंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, या प्रकरणात पुढील चौकशीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. या संदर्भात दोन्ही खेळाडूंकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
अँटी डोपिंग नियमांनुसार आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना आपल्या वास्तव्याची आणि प्रशिक्षणाची माहिती नियमितपणे संबंधित यंत्रणेला देणे बंधनकारक असते. या प्रक्रियेला ‘वेअरअबाउट्स’ असे म्हटले जाते. खेळाडू कोणत्या वेळेत आणि कोणत्या ठिकाणी उपलब्ध असतील, याची माहिती नोंदवणे बंधनकारक असते, जेणेकरून अचानक डोपिंग चाचणी घेता येईल.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, यशस्वी जैस्वालची डोप चाचणी १७ डिसेंबर रोजी केली जाणार होती. तर, शेफाली वर्माची चाचणी ७ नोव्हेंबर रोजी ठरवण्यात आली. मात्र, जेव्हा डीसीओ निश्चित ठिकाणी पोहोचले, तेव्हा या दोन्ही खेळाडूंपैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते. या दोन्ही खेळाडूंची डोप चाचणी हुकल्यानंतर नाडाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली.तसेच यशस्वी जैस्वालकडून १८ फेब्रुवारीपर्यंत तर शेफालीकडून २० फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण मागवण्यात आले. परंतु, दोन्ही खेळाडूंकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांच्याविरोधात चाचणी चुकवल्याची नोंद करण्यात आली.
जयस्वी जैस्वाल, शेफाली वर्मावर कारवाई होणार का?
हे प्रकरण सध्या थेट डोपिंग नियमांचे उल्लंघन या श्रेणीत येत नाही. नियमांनुसार, संबंधित खेळाडू १२ महिन्यात तीन वेळा वेअरअबाउट्स फेल्योर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास किंवा नाडाच्या सुनावणीदरम्यान आपली निर्दोषता सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास त्याला दोन वर्षांपर्यंतच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. सध्या, यशस्वी आणि शेफाली या दोघांकडेही आपली बाजू मांडण्याची संधी आहे. मात्र, या घटनेमुळे भारतीय क्रिकेटमध्ये डोपिंगविरोधी नियमांबाबत नक्कीच एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जातात आणि त्यांनी अलीकडच्या काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.