भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:13 IST2026-05-09T12:12:44+5:302026-05-09T12:13:27+5:30
India and Pakistan Relation: केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गेल्या १०-१२ वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे कमालीचे तणावपूर्ण राहिलेले आहेत.दरम्यान, भारत आणि पाकिस्तानकडून परस्पर संबंध पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गेल्या १०-१२ वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे कमालीचे तणावपूर्ण राहिलेले आहेत. गतवर्षी झालेला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी राबललेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील संबंध हे आणखीनच बिघडले होते. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानकडून परस्पर संबंध पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच भाग म्हणून गेल्या तीन महिन्यांमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये दोनवेळा चर्चा झाली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही या चर्चेची कल्पना आहे.
ऑपरेशन सिंदूरची वर्षपूर्ती होत असतानाच गेल्या वर्षभरात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे माजी जनरल तसेच निवृत्त मुत्सद्दी किमान दोन वेळा भेटले आहेत. त्यामधील एक बैठक ही कतार येथे तर दुसरी बैठक ही इतर कुठल्या तरी आशियाई देशाच्या राजधानीमध्ये झाली. मात्र ह्या बैठका म्हणजे पडद्याआडून साधण्यात आलेला औपचारिक संवाद नव्हे, असेही सांगण्यात येत आहे. पण ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील संवादाची ही पहिलीच वेळ असल्याने तिला अधिक महत्त्व आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्याआड सुरू असलेल्या या चर्चांबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्यालयाला कल्पना आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयालाही पाकिस्तानने व्यक्त केलेल्या या इच्छेबाबत कल्पना देण्यात आली आहे. तसेच पडद्याआडून सुरू असलेल्या या चर्चेबाबत राजकीय पातळीवरून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.
मात्र कुठल्याही हल्ल्याच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या तणावाचं व्यवस्थापन करण्याचा मार्ग शोधणे हे या चर्चेमागचं प्रमुख कारण होतं,असे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत या दोन्ही देशांमध्ये अशा क्रायसिस मॅनेजमेंट सिस्टिमचा अभाव आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान, दोन्ही देशांमध्ये संवादाचं एकमेव माध्यम हे दोन्ही देशांच्या डीजीएमओमधील हॉटलाईन हेच होते. तसेच आजही दोन्ही देशांमधील डीजीएमओ हे आठवड्यातून एकदा संवाद साधतात.