अनेकदा लोक पेट्रोल पंपावर फक्त इंधन भरण्यासाठी जातात आणि लगेच निघून येतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सर्वसामान्यांना काही महत्त्वाच्या सुविधा पूर्णपणे मोफत मिळतात. या सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यास पेट्रोल पंपांना सक्त मनाई आहे. जर एखाद्या पेट्रोल पंपानं या सुविधा देण्यास नकार दिला, तर त्यांच्या विरोधात औपचारिक तक्रार देखील करता येते.
पाहूया कोणत्या सुविधा मोफत मिळतात
१. इंधनाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणं (Quality & Quantity Check)
जर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेलच्या शुद्धतेबद्दल शंका असेल, तर तुम्ही 'फिल्टर पेपर टेस्ट'द्वारे त्याची गुणवत्ता तपासण्याची विनंती करू शकता. तसंच, इंधन कमी दिलं जात असल्याची शंका आल्यास, तुम्हाला प्रमाणाची तपासणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी पंप चालक तुमच्याकडून कोणतंही शुल्क घेऊ शकत नाही.
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
२. प्रथमोपचार पेटी (First Aid Kit)
रस्त्यावर प्रवास करताना अपघात झाल्यास अशा आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास, तुम्ही जवळच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटीची मागणी करू शकता. प्रत्येक पंपावर ही सुविधा उपलब्ध असणं अनिवार्य आहे.
३. आणीबाणीच्या वेळी फोन कॉल
प्रवासादरम्यान तुमचा मोबाईल बंद पडला असेल किंवा बॅटरी संपली असेल आणि तुम्हाला तातडीनं कोणाशी संपर्क साधायचा असेल, तर तुम्ही पेट्रोल पंपावरील टेलिफोन सुविधेचा वापर करू शकता. अशा परिस्थितीत मदत करणं ही तिथल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.
४. स्वच्छ प्रसाधनगृह (Free & Clean Toilet)
लांबच्या प्रवासात महिलांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह शोधणं कठीण होतं. म्हणूनच, प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वच्छ आणि मोफत प्रसाधनगृहाची सोय असणं बंधनकारक आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्या पंपाचे ग्राहक असणंच गरजेचं नाही, कोणीही व्यक्ती याचा वापर करू शकते.
५. पिण्याचे शुद्ध पाणी
प्रत्येक पेट्रोल पंपावर पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे. प्रवासी तिथे पाणी पिऊ शकतात किंवा आपली पाण्याची बाटलीही भरून घेऊ शकतात.
६. टायरमध्ये मोफत हवा भरणं
अनेक लोक आजही टायरमध्ये हवा भरण्यासाठी पैसे देतात, पण ही सेवा पूर्णपणे मोफत असते. तुम्ही तिथून पेट्रोल भरले असो किंवा नसो, टायरमध्ये हवा भरण्यासाठी पेट्रोल पंप चालक फी आकारू शकत नाही.
तक्रार कुठे करावी?
जर वरील सुविधा देण्यास पेट्रोल पंपाने नकार दिला, तर तुम्ही pgportal.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करू शकता. याशिवाय संबंधित पेट्रोल कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येतो. तसंच, प्रत्येक पंपावर तक्रार आणि सूचना नोंदवही असणं अनिवार्य आहे, जी ग्राहक मागू शकतात.
