Lux, Emami, ITC..; 'या' आहेत पश्चिम बंगालमधील १० सर्वात मोठ्या कंपन्या, माहितेय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:17 IST2026-05-06T14:03:54+5:302026-05-06T14:17:08+5:30
तुम्ही रोज या कंपन्यांचे सामान वापरता..!

From Bengal to the World: पश्चिम बंगाल केवळ सांस्कृतिक वारशासाठीच नव्हे, तर औद्योगिक आणि व्यावसायिक सामर्थ्यासाठीही देशभर ओळखले जाते. विशेषतः कोलकाता शहर अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्यालय असल्यामुळे भारतातील महत्त्वाचे कॉर्पोरेट हब आहे. जूट, लोखंड आणि पोलाद उद्योगांपासून सुरू झालेला बंगालचा औद्योगिक प्रवास आज IT, FMCG, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऊर्जा क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. राज्यातील अनेक कंपन्यांनी देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण केली आहे. चला जाणून घेऊया कोलकात्यात मुख्यालय असलेल्या अशाच १० दिग्गज कंपन्यांविषयी...

१. ITC Limited- ITC ही कोलकात्यातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांपैकी एक मानली जाते. सुरुवातीला ‘इम्पीरियल टोबॅको कंपनी’ म्हणून सुरू झालेल्या या समूहाने आज FMCG, हॉटेल्स, कृषी व्यवसाय, पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग क्षेत्रात मोठा विस्तार केला आहे.

२. Coal India Limited- भारत सरकारच्या मालकीची Coal India ही जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. देशातील बहुतांश थर्मल पॉवर प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही कंपनी सांभाळते. कंपनीचे मुख्यालय कोलकात्यातील न्यू टाउन येथे आहे.

३. Emami Group- १९७४ मध्ये राधेश्याम अग्रवाल आणि राधेश्याम गोयंका यांनी सुरू केलेला Emami Group आज भारतीय FMCG क्षेत्रातील मोठे नाव बनले आहे. कंपनी मुख्यतः हेल्थ आणि कॉस्मेटिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित करते. बोरोप्लस, नवरत्न तेल, झंडू बाम आणि फेअर अँड हँडसम ही कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत.

४. Exide Industries- Exide Industries ही भारतातील सर्वात मोठ्या बॅटरी उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ऑटोमोबाईल, औद्योगिक आणि पाणबुडी बॅटरी निर्मितीत कंपनीचे मोठे वर्चस्व आहे. कंपनीचे मुख्यालय कोलकात्यातील साल्ट लेक परिसरात आहे.

५. Berger Paints India- Berger Paints ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची पेंट उत्पादक कंपनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या या कंपनीने आज जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कंपनीचे मुख्यालय पार्क स्ट्रीट, कोलकाता येथे आहे.

६. Bandhan Bank- बंधन बँकेची सुरुवात मायक्रो फायनान्स संस्थेच्या रूपात झाली होती. नंतर ती पूर्णपणे खासगी बँकेत रूपांतरित झाली. ग्रामीण आणि निमशहरी भागात बँकेचे मोठे नेटवर्क आहे. कंपनीचे मुख्यालय कोलकात्यातील साल्ट लेक येथे आहे.

७. Eveready Industries India- Eveready हे नाव भारतात जवळपास शतकभरापासून बॅटरी आणि फ्लॅशलाइटसाठी प्रसिद्ध आहे. पोर्टेबल एनर्जी सोल्यूशन्स क्षेत्रात कंपनी आजही अग्रस्थानी मानली जाते.

८. Lux Industries Limited- Lux Industries ही भारतातील आघाडीची इनरवेअर आणि होजरी उत्पादक कंपनी आहे. ‘Lux Cozi’ सारख्या लोकप्रिय ब्रँडमुळे कंपनीने बाजारात मजबूत स्थान निर्माण केले आहे. मजबूत डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आणि प्रभावी मार्केटिंग ही कंपनीची मोठी ताकद मानली जाते.

९. IFB Industries- IFB Industries ही कंपनी वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि डिशवॉशर यांसारख्या होम अप्लायन्सेससाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षेत्रातही कंपनीचे मोठे योगदान आहे.

१०. RP-Sanjiv Goenka Group- RP-Sanjiv Goenka Group हा कोलकात्यातील एक मोठा उद्योगसमूह आहे. वीज वितरण, कार्बन ब्लॅक उत्पादन आणि रिटेल क्षेत्रात हा समूह कार्यरत आहे. समूहातील प्रमुख कंपन्या- CESC Limited, PCBL Limited. याशिवाय, IPL मध्ये समूहाचा लखनौ सुपर जायंट्स नावाचा संघही खेळत आहे.

या सर्व कंपन्यांची मुख्यालये कोलकात्यात असणे हे पश्चिम बंगालच्या मजबूत औद्योगिक पायाभरणीचे प्रतीक मानले जाते. या कंपन्या केवळ रोजगारनिर्मिती करत नाहीत, तर कोलकात्याला देशातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र म्हणूनही टिकवून ठेवत आहेत. औद्योगिक परंपरा, व्यावसायिक संधी आणि मोठ्या कॉर्पोरेट उपस्थितीमुळे पश्चिम बंगाल आजही देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
















