"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:52 IST2026-05-06T14:52:08+5:302026-05-06T14:52:54+5:30
पंजाबमधील जालंधर आणि अमृतसर स्फोटांवर फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.

"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
पंजाबमधील जालंधर आणि अमृतसरमध्ये झालेल्या दोन भीषण स्फोटांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. "हिंदुस्तानात स्फोट होतच असतात, यात कोणती मोठी आणि नवीन गोष्ट आहे?" असे म्हणत त्यांनी या संवेदनशील घटनेला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?
पंजाबमधील दुहेरी स्फोटांनंतर प्रसारमाध्यमांनी अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, "हिंदुस्तानात स्फोट होतच असतात, हे काही नवीन नाही. तुम्ही घाबरू नका." देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या एवढ्या गंभीर मुद्द्यावर अब्दुल्ला यांनी दिलेल्या या 'अजब' सल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी (५ मे) रात्री पंजाबमध्ये तीन तासांच्या अंतराने दोन मोठे स्फोट झाले. जालंधरमध्ये रात्री ८ वाजता बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये जोरदार स्फोट झाला. सीसीटीव्हीमध्ये एक संशयित व्यक्ती वस्तू ठेवताना दिसत आहे. या स्फोटात बीएसएफचा एक अधिकारी जखमी झाला. जालंधरनंतर काही वेळातच अमृतसरच्या 'खासा' येथील लष्करी छावणी परिसरात दुसरा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र लष्करी तळाजवळ स्फोट झाल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
सरकारवर टीकेची झोड
एकीकडे अब्दुल्ला यांनी हे स्फोट सामान्य असल्याचे म्हटले असताना, दुसरीकडे पंजाबमधील विरोधी पक्षांनी भगवंत मान सरकारला धारेवर धरले आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला आहे. तर शिरोमणि अकाली दलचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनी "पंजाबची सुरक्षा यंत्रणा फेल झाली आहे का?" असा सवाल उपस्थित केला आहे. या दोन्ही स्फोटांचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत केला जाणार आहे. घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून, यामागे आंतरराष्ट्रीय कट आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.