₹३१३ कोटींची FD; खात्यात ₹२१३ कोटी अन् लाखोंचे शेअर, विजयची गुंतवणूक पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:34 IST2026-05-05T16:30:19+5:302026-05-05T16:34:08+5:30
थलापती विजय लवकरच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Thalapathy Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणात नव्याने एंट्री करणारे जोसेफ विजय उर्फ थलापती विजय यांच्याकडे तब्बल ₹६२४ कोटींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या गुंतवणूकीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे.

विजय यांचे प्रतिज्ञापत्र पाहता, त्यांची गुंतवणूक अत्यंत सुरक्षित असल्याचे दिसते. त्यांनी शेअर बाजारातील जोखमीऐवजी बँक ठेवी आणि फिक्स्ड डिपॉझिटवर अधिक भर दिला आहे. त्यांनी Indian Overseas बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ₹२१३.३६ कोटी, तर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ₹१०० कोटींपेक्षा अधिक गुंतवले आहेत.

याशिवाय, अॅक्सिस बँकेत ₹४० कोटी, HDFC बँकेत ₹२० कोटी अन् स्टेट बँक ऑफ इंडियात ₹१५ कोटी, म्हणजेच, एकूण ₹३१३ कोटींपेक्षा अधिक रक्कम पूर्णपणे सुरक्षित बँक डिपॉझिटमध्ये गुंतवलेली आहे.

आजच्या काळात अनेक जण शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करतात. मात्र विजय यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी फक्त ₹१९.३७ लाख शेअर बाजारात गुंतवले आहेत. यात जयनगर प्रॉपर्टी प्रा. लि. मध्ये ₹१९.०३ लाख, इंडियन ओव्हरसीज बँकेत ₹९,६०० आणि सन पेपर मिलमधील ₹२५,००० चा समावेश आहे.

विजय यांच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेटचा मोठा वाटा आहे. त्यांची एकूण स्थावर मालमत्ता ₹२२० कोटींची आहे. यात ₹११५ कोटींची घरे (नीलांकरई, एग्मोर, मायलापूर – चेन्नई) आणि ₹८२.८ कोटींची (कोप्पूर, शोलिंगनल्लूर) व्यावसायिक मालमत्ता सामील आहे.

विजय यांच्याकडे ₹१३.५२ कोटींच्या गाड्या आहेत, ज्यात BMW i7, Toyota Lexus आणि Tata Caravansचा समावेश आहे. याशिवाय, त्यांच्या ताफ्यात सामान्य वापरातील Maruti Swift आणि TVS XL Super देखील आहेत. विजय यांनी एकूण ₹७५.५ कोटींचे कर्ज आणि अॅडव्हान्स दिले आहेत. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचा समावेश आहे.

















