ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 17:34 IST2026-05-05T17:33:24+5:302026-05-05T17:34:12+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी कोल ॲलनची जज जिया फारूकी यांनी माफी मागितली आहे.

ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीबद्दल तेथील न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या अमेरिकेच्या राजकारणात आणि न्यायव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे. व्हाईट हाऊस डिनर पार्टीत गोळीबार करणाऱ्या कोल ॲलन या आरोपीची चक्क न्यायाधीशांनी माफी मागितली असून, तुरुंगात त्याच्यासोबत होणाऱ्या वागणुकीवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकारामुळे ट्रम्प प्रशासन कमालीचे संतापले आहे.
नेमकं प्रकरण काय?
२५ एप्रिल रोजी ३१ वर्षीय कोल ॲलन याने 'व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनर' दरम्यान सुरक्षा यंत्रणा भेदून हॉटेलच्या लॉबीत गोळीबार केला होता. त्याच्याकडून शॉटगन, पिस्तूल आणि चाकू जप्त करण्यात आले होते. इतकेच नाही, तर ट्रम्प प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांची एक 'टारगेट लिस्ट' देखील त्याच्याकडे सापडली होती. या गंभीर गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
न्यायाधीश का म्हणाले 'सॉरी'?
या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना मॅजिस्ट्रेट जज जिया फारूकी यांनी आरोपी कोल ॲलनला उद्देशून म्हटले, "तुमच्यासोबत तुरुंगात जे काही घडले, त्यासाठी मी तुमची माफी मागतो." जज फारूकी यांनी चिंता व्यक्त केली की, आरोपीला अमानवीय परिस्थितीत ठेवले जात आहे. ६ जानेवारी २०२१ च्या कॅपिटल हिल हल्ल्यातील आरोपींच्या तुलनेत ॲलनसोबत जास्त कठोरता बाळगली जात असल्याचा ठपकाही कोर्टाने ठेवला. "कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होण्यापूर्वी त्याच्याशी माणुसकीने वागवले पाहिजे," असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.
तुरुंगातील ती भयंकर वागणूक
कोल ॲलनच्या वकिलांनी कोर्टात असा दावा केला की, त्याला 'सुसाईड वॉच' खाली ठेवण्यात आले आहे. त्याला एका अशा खोलीत ठेवले आहे, जिथे २४ तास लाईट सुरू असते आणि त्याला एक विशेष जॅकेट घालावे लागते, ज्यामुळे त्याला हालचाल करणे कठीण होते. वैद्यकीय चाचणीत त्याने आत्महत्येचे कोणतेही संकेत दिले नसतानाही त्याला अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.
ट्रम्प प्रशासन आक्रमक
न्यायाधीशांच्या या भूमिकेवर ट्रम्प प्रशासनाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारी वकील जीनिन पिरो यांनी कोर्टाच्या टिप्पणीवर टीका करताना म्हटले की, "इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला विशेष सुविधा देण्याची मागणी करणे चुकीचे आहे." ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी तर असा आरोप केला आहे की, न्यायाधीश एका संभाव्य मारेकऱ्याला सहानुभूती दाखवत आहेत. सध्या कोल ॲलनने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप नाकारले असून, हे हाय-प्रोफाईल प्रकरण आता कोणत्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.