सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:26 IST2026-05-05T18:26:13+5:302026-05-05T18:26:49+5:30
एसीमध्ये आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी हे ६ वॉर्निंग सिग्नल ओळखा.

सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
वाढत्या उन्हामुळे सध्या घराघरांत एसीचा वापर वाढला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका भीषण दुर्घटनेत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला. उन्हाळ्यात तापमान ५० अंशांच्या जवळ जात असल्याने एसीवर ताण येतो आणि तांत्रिक बिघाडामुळे त्याचे रूपांतर मोठ्या स्फोटात होऊ शकते. त्यामुळेच, तुमचा एसी ब्लास्ट होण्यापूर्वी काही विशिष्ट वॉर्निंग सिग्नल' देतो, ते ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.
एसी सुरू असताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या:
जळल्याचा वास येणे: जर तुम्हाला एसी सुरू केल्यानंतर किंवा इनडोअर युनिटच्या आसपास काहीतरी जळाल्यासारखा वास येत असेल, तर लगेच सावध व्हा. ओव्हरहीटिंग किंवा अंतर्गत वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे असा वास येतो. अशा वेळी एसी तत्काळ बंद करा.
धूर निघताना दिसणे: एसीमधून धूर निघणे ही धोक्याची सर्वात मोठी घंटा आहे. जर तुम्हाला थोडा जरी धूर दिसला, तर स्विच बंद करून मेन पॉवर सप्लाय खंडित करा. जोपर्यंत तंत्रज्ञ येऊन तपासणी करत नाही, तोपर्यंत एसी पुन्हा सुरू करू नका.
विचित्र आवाज येणे: एसीमधून काहीतरी तुटल्याचा किंवा आदळल्याचा आवाज येत असेल, तर याचा अर्थ आतील एखादा भाग ढिला झाला आहे किंवा बिघडला आहे. सामान्य आवाजापेक्षा जास्त आवाज येणारा एसी वापरणे धोकादायक ठरू शकते.
वारंवार ट्रिप होणे: जर तुमचा एसी आपोआप वारंवार सुरू आणि बंद होत असेल, तर हे ओव्हरहीटिंगचे लक्षण आहे. कॉम्प्रेसरवर जास्त ताण आल्यास असे घडते आणि यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.
गरम हवा किंवा कुलिंग न होणे: खूप वेळ चालूनही एसी ठंडी हवा देत नसेल, तर गॅस गळती असू शकते. तसेच एसीमधून गरम हवा येणे हे मशीन ओव्हरहीट झाल्याचे लक्षण आहे. हे वेळीच दुरुस्त न केल्यास स्फोट होऊ शकतो.
पाणी गळती आणि ठिणग्या: एसीमधून पाणी गळत असल्यास आतील इलेक्ट्रॉनिक भागांमध्ये ओलावा जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते. तसेच जर तुम्हाला स्विच बोर्ड किंवा एसी युनिटमध्ये ठिणग्या दिसल्या, तर तो गंभीर तांत्रिक बिघाड आहे.
बचावासाठी काय कराल?
- उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असताना एसीची रेग्युलर सर्व्हिसिंग करून घ्या.
- एसीचे फिल्टर्स वेळोवेळी स्वच्छ करा.
- एसीसाठी दर्जेदार वायरिंग आणि स्टेबलायझरचा वापर करा.
- खूप जास्त वेळ सतत एसी सुरू ठेवणे टाळा, मधूनच त्याला विश्रांती द्या.
तुमची थोडीशी सतर्कता एका मोठ्या अपघातापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करू शकते.