Post Office च्या 'या' योजनेत एकदाच गुंतवणूक करा; फक्त व्याजातून होईल ₹४.५० लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:43 IST2026-05-07T12:35:27+5:302026-05-07T12:43:49+5:30

Post Office NSC: या योजनेत आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभही मिळतो.

Post Office NSC: सुरक्षित गुंतवणूक आणि हमखास परतावा देणारी योजना शोबत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठीच आहेत. सरकारच्या गॅरंटीसह येणाऱ्या या योजनांमध्ये जोखीम अत्यंत कमी असते. अशाच योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट योजना (NSC), ज्यामध्ये एकरकमी गुंतवणूक करून केवळ व्याजातूनच लाखोंची कमाई करता येऊ शकते.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवलेले पैसे सरकारच्या हमीखाली सुरक्षित असतात. त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा या योजनांवर परिणाम होत नाही. यामुळेच निवृत्त व्यक्ती, महिला, पालक आणि सुरक्षित गुंतवणूक पसंत करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनांकडे वळताना दिसतात. सध्या NSC योजनेवर ७.७ टक्के दराने व्याज दिले जात असून, दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही योजना आकर्षक ठरत आहे.

या योजनेतील व्याज कंपाउंडिंग पद्धतीने जोडले जाते आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर एकरकमी रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, या योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी गुंतवणूक ५ वर्षांच्या लॉक-इन कालावधीपर्यंत कायम ठेवणे आवश्यक आहे.

या योजनेत किमान ₹१,००० पासून गुंतवणुकीची सुरुवात करता येते, तर कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. १० वर्षांखालील मुलांच्या नावाने खाते उघडण्याची सुविधादेखील यात आहे. विशेष म्हणजे, आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभही मिळतो. एका आर्थिक वर्षात ₹१.५ लाखांपर्यंत कर बचतीची संधी या योजनेत मिळते.

या योजनेत ₹१० लाखांची एकरकमी गुंतवणूक केल्यास ७.७ टक्के व्याजदरानुसार ५ वर्षांनंतर फक्त व्याजातून ₹४.५० लाख कमाई होऊ शकते. (उदा:- गुंतवणूक रक्कम : ₹१०,००,०००. व्याजदर : ७.७%. कालावधी : ५ वर्षे) ५ वर्षांनंतर गुंतवणुकीची एकूण रक्कम अंदाजे ₹१४,४९,०३४ इतकी होते. यामध्ये केवळ व्याजातून मिळणारी कमाई सुमारे ₹४,४९,०३४ इतकी असते.

NSC योजनेत मुदतपूर्व खाते बंद करण्याची सुविधा असली, तरी त्याचे काही तोटेही आहेत. नियमांनुसार, खाते उघडल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी किंवा काही विशेष परिस्थिती वगळता खाते बंद केल्यास व्याजाचा लाभ मिळत नाही. अशावेळी गुंतवणूकदाराला केवळ मूळ रक्कम परत मिळते. त्यामुळे या योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी गुंतवणूक पूर्ण ५ वर्षे कायम ठेवणे फायदेशीर मानले जाते.