पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:55 IST2026-05-09T11:54:45+5:302026-05-09T11:55:49+5:30
Eknath Shinde on West Bengal Politics BJP Success: प. बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचेही केले अभिनंदन

पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
Eknath Shinde on West Bengal Politics BJP Success: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम असल्याचेही शिंदे म्हणाले.
प. बंगालमध्ये जनतेचा विकासाला कौल
"स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच पश्चिम बंगालमध्ये एनडीएला मोठे यश आहे. पश्चिम बंगालमध्ये भय आणि भरोसा अशी लढाई होती. जनतेने भयाला नाकारत भरोशाला स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न जनतेसमोर ठेवले आणि देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या भूमिकेवर जनतेने विश्वास दाखवला आहे,” असेही ते म्हणाले.
अमित शाहांचे कौतुक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. अमित शहा यांनी पुन्हा एकदा स्वतःला आधुनिक राजकारणातील चाणक्य म्हणून सिद्ध केले आहे.”
प. बंगालने दहशतवाद आणि गुंडाराजाच्या राजकारणाला नाकारले
"डबल इंजिन सरकारमुळे पश्चिम बंगालमध्ये विकासाला वेग मिळेल. उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या बाबतीत पश्चिम बंगाल आता नव्या दिशेने पुढे जाईल. राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, नवीन कंपन्या येतील आणि विकासाचा मुख्य प्रवाह अधिक मजबूत होईल. जनतेने राष्ट्रहित आणि विकासाला पसंती दिली असून भ्रष्टाचार, दहशतवाद आणि गुंडाराजाच्या राजकारणाला नाकारले आहे. मोदीजींचे ‘नेशन फर्स्ट’ धोरण जनतेला मान्य झाले आहे,” असे शिंदे म्हणाले.
सुवेंदु अधिकारी यांचे विशेष कौतुक
पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. “दहशतीसमोर न झुकता कार्यकर्त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अनेकांनी लाठ्या-काठ्यांचा सामना केला, पण ते मागे हटले नाहीत. त्या मेहनतीमुळेच आजचा विजय दिसत आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.