उन्हाळ्यात इडलीचं पीठ आंबट होतं- फसफसतं? ६ टिप्स - आंबूस वास न येता करा हॉटेलसारख्या मऊ- लुसलुशीत इडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 20:00 IST2026-05-04T20:00:00+5:302026-05-04T20:00:02+5:30
Idli batter storage tips for summer: Why idli batter smells sour and how to fix it: आपल्यालाही उन्हाळ्यात नाश्त्यात इडली- डोसा खायचा असेल आणि बॅटर आंबलेले नको असेल तर या ६ टिप्स लक्षात ठेवा.

इडली-डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात. सकाळच्या नाश्त्याला मऊ आणि लुसलुशीत इडल्या असतील तर दिवसाची सुरुवात छान होते. मात्र, उन्हाळ्यात उष्णतेमुळे पिठाचे आंबायला लागण्याचे प्रमाण खूप वाढते. अनेकदा पीठ इतके फसफसते की ते भांड्यातून बाहेर येऊ लागते आणि त्याची चव अत्यंत आंबट किंवा खट्ट होते. अशावेळी हे आंबलेल पीठ फेकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण हे पीठ फेकून देण्याची अजिबात गरज नाही. (Idli batter storage tips for summer)

पिठाचा हा आंबटपणा कमी करुन ते पुन्हा ताजे करण्यासाठी काही सोप्या किचन ट्रिक्स वापरता येतात. जर आपल्यालाही उन्हाळ्यात नाश्त्यात इडली- डोसा खायचा असेल आणि बॅटर आंबलेले नको असेल तर या ६ टिप्स लक्षात ठेवा. (Why idli batter smells sour and how to fix it)

पीठ खूप आंबट झाले असेल तर पिठाच्या वरच्या बाजूला थोडे थंड पाणी घाला. ते तसेच ५ ते १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर वरचे पाणी हळूच काढून टाका. पिठातील अतिरिक्त आंबटपणा पाण्यासोबत निघून जाण्यास मदत होते. पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

इडलीचे बॅटर खूपच आंबट झाले असेल तर त्यात चिमूटभर साखर किंवा थोडासा गूळ घाला. यामुळे पीठ तर गोड होणार नाही, पण आंबटपणा कमी होईल. तसेच चव आणि वास दोन्ही चांगली असेल.

जेव्हा पीठ पातळ आणि खूप आंबट वाटत असेल तेव्हा त्यात रवा किंवा तांदळाचे पीठ घालणे उत्तम ठरते. यामुळे पीठ घट्ट होते. डोसा अधिक कुरकुरीत आणि चविष्ट होतो.

जर आपल्या घरी इडलीचे फ्रेश बॅटर असेल तर ते आंबट पिठात मिसळा. यामुळे चवीचा समतोल साधला जातो आणि आंबटपणा कमी होतो. तसेच पीठाचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घाला.

पिठाचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात २-३ चमचे ताजे दही किंवा अर्धी वाटी दूध मिसळा. दूध किंवा दही घातल्यामुळे पिठाची चव संतुलित होते आणि इडल्या अधिक पांढऱ्या शुभ्र आणि मऊ होतात. दही वापरताना ते फेटून मगच पिठात मिक्स करावे.

पिठात थोडे घट्ट नारळाचे दूध मिसळल्यास पिठाचा आंबटपणा कमी होतो. यामुळे इडल्यांना एक वेगळीच चविष्ट आणि क्रीमयुक्त चव मिळते. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जाते.

इडलीचे पीठ आंबवण्याच्या प्रक्रियेद्वारे तयार केले जाते, ज्यामध्ये उपयुक्त जिवाणू आणि यीस्टचा सहभाग असतो. याच प्रक्रियेमुळे इडल्या मऊ आणि हलक्या होतात. पण ही प्रक्रिया प्रमाणापेक्षा जास्त होते, तेव्हा पीठ खूप आंबट होते. उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात पीठ लवकर आंबते. जास्त वेळ बाहेर ठेवल्यास ते जास्त आंबट होऊ शकते. त्यामुळे हवामान आणि वेळेचा विचार करणं महत्त्वाचं आहे.
















