ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 22:29 IST2026-05-04T22:26:37+5:302026-05-04T22:29:49+5:30
Mamata Banerjee Big Defeat in West Bengal Assembly Election 2026: भवानीपूर मतदारसंघात मोठा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपावर गंभीर आरोप केले.

ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Mamata Banerjee Big Defeat in West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमधील विजय हा भाजपाचा अनैतिक विजय आहे. भाजपावाले आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. मलाही धक्काबुक्की केली, मारहाण केली. आम्ही पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा तक्रार केली, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा मोठा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना दुहेरी धक्का बसला आहे. एकीकडे गेल्या १५ वर्षांची सत्ताही गेली आणि दुसरीकडे भवानीपूर मतदारसंघातही ममता बॅनर्जी यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
भवानीपूर मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दिवसभर कधी ममता बॅनर्जी यांचे पारडे जड होत होते, तर कधी सुवेंदू अधिकारी आघाडी घेत होते. संपूर्ण २० फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर अखेरीस सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार १०५ मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३ हजार ९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मतांवर समाधान मानावे लागले. भवानीपूर मतदारसंघातील मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना ममता बॅनर्जी यांनी भाजपावर गंभीर आरोप केले.
भाजपाने मते चोरली, मला धक्काबुक्की केली, मी गुन्हेगार आहे का?
पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने १०० हून अधिक जागा लुटल्या आहेत. भाजपाने मते चोरली आहेत. त्यांनी मला घेरले. हा भाजपाचा अनैतिक विजय आहे. मी बंगाल निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पण आम्ही जिंकू. मला आत ढकलण्यात आले, मारहाण करण्यात आली. हा भाजपाचा विजय नाही, तर ही एक लूट आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय दल, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या संगनमताने जे काही केले आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. फेरमतमोजणी झाली पाहिजे. मी जिंकत होतो. त्यांनी प्रत्येक फेरीत हेराफेरी केली. हे फसवणुकीचे संपूर्ण प्रकरण आहे. तुम्हीच पाहा की, त्यांनी मला कशी वागणूक दिली. मी गुन्हेगार आहे का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.
दरम्यान, नंदीग्राम या मतदारसंघातूनही सुवेंदू अधिकारी यांनी मोठा विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसच्या पबित्रा कर यांचा ०९ हजार ६६५ मतांनी पराभव केला. नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांना ०१ लाख २७ हजार ३०१ मते मिळाली, तर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला १ लाख १७ हजार ६३६ मते मिळाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपा एकूण २०७ जागांवर आघाडीवर असून, यापैकी १९२ जागी भाजपा उमेदवारांना विजय मिळाला आहे. तर, तृणमूल काँग्रेस ६७ जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसला २ जागा मिळाल्या असून, आम जनता उन्नयन पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत. सीपीआय एम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत.