गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 17:37 IST2026-05-05T16:56:37+5:302026-05-05T17:37:29+5:30

West Bengal CM: भारतीय राजकारणात पश्चिम बंगालचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेक राज्यांमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापालट होतो, तिथे बंगालने गेल्या ५० वर्षांत कमालीची राजकीय स्थिरता पाहिली आहे.

गेल्या ५० वर्षांचा इतिहास पाहिला तर या राज्यात फक्त तीन मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केले आहे. ५० वर्षांमध्ये डाव्या आघाडीच्या राजवटीचा मोठा वाटा आहे.

डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र पश्चिम बंगालचे पहिले 'प्रीमियर' (तेव्हा मुख्यमंत्री या पदाला प्रीमियर म्हटले जाई) म्हणून शपथ घेतली.

स्वातंत्र्यानंतर बिधानचंद्र रॉय यांनी १९४८ ते १९६२ या काळात बंगालचे नेतृत्व केले. मात्र, त्यानंतर १९६७ ते १९७२ या काळात राज्यात युती सरकारांमुळे अस्थिरतेचे वातावरण होते.

१९ वर्षांनंतर, २१ नोव्हेंबर १९६७ रोजी प्रफुल्लचंद्र घोष जेव्हा पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा त्यांचा कार्यकाळ केवळ २ महिने २९ दिवस इतका अल्प होता. यावेळी त्यांनी 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स फ्रंट'च्या युती सरकारचे नेतृत्व केले.

सिद्धार्थ शंकर राय यांच्या रूपाने काँग्रेसने आपली शेवटची मोठी खेळी खेळली. त्यांच्या कार्यकाळानंतर बंगालच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली.

पश्चिम बंगालच्या इतिहासातील सर्वात प्रभावी नाव म्हणजे ज्योती बसू. २१ जून १९७७ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आणि ५ नोव्हेंबर २००० पर्यंत, सलग पाच वेळा ते या पदावर विराजमान होते.

२३ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. सीपीएम च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले बसू ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

ज्योती बसू यांच्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी १० वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळले. मात्र, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवामुळे डाव्या आघाडीची तब्बल ३४ वर्षांची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आली.

२०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी बदलाची लाट आणत तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापन केली. तेव्हापासून आजतागायत त्या मुख्यमंत्रीपदी कायम होत्या. गेल्या ५० वर्षांतील तीन महत्त्वाच्या मुख्यमंत्र्यांच्या या यादीत त्यांचे नाव घेतले जाते.

पश्चिम बंगालच्या गेल्या ५ दशकांच्या राजकीय प्रवासात प्रामुख्याने ज्योती बसू, बुद्धदेव भट्टाचार्य आणि ममता बॅनर्जी या तीनच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा मोठा प्रभाव जाणवतो. मात्र, इतर मुख्यमंत्र्यांचा लहान कार्यकाळामागेही एक मोठा राजकीय संघर्ष आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.