बिहार विधानसभेत फुल्ल राडा, आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 09:01 AM2021-03-24T09:01:10+5:302021-03-24T09:11:47+5:30

अति मागास समाजातून आलेल्या आमच्या महिला आमदारांचे केस ओढण्यात आले. आमच्या आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी, जवानांनी हे कृत्य केल्याचं यादव म्हणाले.

बिहारमध्ये राज्य सरकारचं अधिवेशन सत्र सुरू असून मंगळवारी या अधिवेशन सत्रात चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. सुरक्षा रक्षक आणि आमदारांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं

विधीमंडळात मंगळवारी विशेष सशस्त्र पोलीस विधेयक 2021 संमत करण्यात आले. त्यानंतर, विरोधकांनी गोंधळ केला. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हे बिल फाडून अध्यक्षांसमोरच फेकून दिले.

तेजस्वी यादव यांनी अशारितीने आपला विरोध दर्शवल्यानंतर इतर आमदारांनीही या विधेयकाला विरोध असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. तसेच, वेलमध्ये येऊन आपला विरोध दर्शवला.

सभागृहात गोंधळाची परिस्थिती वाढल्यानंतर पोलीस आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी सभागृहात येऊन आमदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन, आमदारांनी पुन्हा एकदा सरकारविरोधी घोषणबाजी केली.

आमदारांना सभागृहाबाहेर घेऊन येतानाची विरोधकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

विधानसभा सभागृहात आमदारांसमवेत करण्यात आलेल्या व्यवहारामुळे राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार सरकारवर जबरी टीका केलीय. नितीश कुमार सरकार हे बलात्काऱ्यांपेक्षाही वाईट असल्याचं आरजेडीने म्हटलंय.

लोकशाहीची माता असलेल्या बिहारमधील लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधानसभेत लोकशाहीला नागवं केलयं. लोकशाहीचा बलात्कार केलाय, अशी गंभीर टीकाही केली.

आमदार महेबुब आलम यांच्यासह अनेक आमदारांचा कुर्ता फाडण्यात आल्याचा आरोप या आमदारांना केला आहे. सरकार वाद-विवाद होऊ देत नसून माफिया राज असल्यागत वागत आहे, असेही ते म्हणाले.

अति मागास समाजातून आलेल्या आमच्या महिला आमदारांचे केस ओढण्यात आले. आमच्या आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी, जवानांनी हे कृत्य केलं असून आम्ही जेव्हा सभागृहात असतो तेव्हा मुख्यमंत्री सभागृहाबाहेर असतात, असेही यादव म्हणाले.