'या' योजनेद्वारे होणार ऑर्गन ट्रान्सप्लांट; खर्च सरकार उचलणार, वर्षाला पाच लाखांचे सुरक्षा कवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:49 IST2026-04-21T19:24:58+5:302026-04-21T19:49:12+5:30

राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा मोठा विस्तार करत गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. आता अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत खर्चिक शस्त्रक्रियाही या योजनांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येणाऱ्या उपचारांसाठीही शासन मदत करणार आहे. यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी जीवनदानाची नवी आशा निर्माण झाली आहे.

५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा खर्चही होणार : या योजनांतर्गत साधारण ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होते. मात्र, आता अवयव प्रत्यारोपणासारख्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी लागणारा अतिरिक्त खर्च राज्य सरकारच्या राखीव निधीतून दिला जाणार आहे.

या दुर्मीळ व प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश : यामध्ये यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी), हृदय (हार्ट), फुफ्फुस (लंग) यांसारख्या अवयव प्रत्यारोपणासह काही दुर्मीळ आजारांवरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.

या रुग्णांना दिलासा मिळणार : अत्यंत खर्चिक उपचार परवडत नसल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत होते. या निर्णयामुळे गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निकष आणि अटी काय? : रेशन कार्ड असणे आवश्यक, नोंदणीकृत अधिकृत रुग्णालयातच मिळणार उपचार, योजनेत नोंदणी करणे आवश्यक तसेच प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञ समितीची मान्यता आवश्यक आहे.

ही कागदपत्रे हवीत : आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र वैद्यकीय अहवाल व डॉक्टरांचे प्रमाणपत्र या योजनेचा लाभघेण्यासाठी आवश्यक आहे.

अशी आहे अर्ज प्रक्रिया : महात्मा फुले/आयुष्मान योजनेत नोंदणी करणे आवश्यक आहे, शासकीय किंवा अधिकृत रुग्णालयात तपासणी, आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यानंतर समितीकडून मंजुरीनंतर उपचारास सुरुवात केली जाते.